अल रयान (कतार) : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी विजय अनिवार्य असलेल्या दक्षिण कोरियाने ह गटातील आपल्या अखेरच्या सामन्यात बलाढ्य पोर्तुगालला २-१ असा धक्का दिला. यासह दक्षिण कोरियाने दिमाखात आगेकूच केली. सलग दोन सामने जिंकून तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या पोर्तुगालने गटात अव्वल स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला.
दक्षिण कोरियाच्या या अनपेक्षित पराभवामुळे घानाला २-० असे नमवूनही उरुग्वेला स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला. दक्षिण कोरियाने सरस गोल अंतराच्या जोरावर बाद फेरी गाठताना उरुग्वेला स्पर्धेबाहेर केले. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला रिकार्डो होर्ताने शानदार गोल करत पोर्तुगालला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर २७व्या मिनिटाला किम यंग-गाँन याने गोल करत कोरियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
गेल्या दहा विश्वचषक सामन्यांमध्ये दक्षिण कोरियाने पहिल्यांदाच पहिल्या सत्रात गोल केला.१९६६ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर पोर्तुगालने सर्वाधिक ६ वेळा सामन्यातील पहिल्या पाच मिनिटांमध्ये गोल करण्याचा पराक्रम केला.यंदाच्या स्पर्धेतून विश्वचषक पदार्पण करताना गोल करणारा रिकार्डो होर्ता हा जोआओ फेलिक्स आणि राफेल लीओ यांच्यानंतरचा तिसरा पोर्तुगीज फुटबॉलपटू ठरला.१९व्या वर्षी विश्वचषक स्पर्धेत खेळणारा अँटोनिओ सिल्वा हा पहिला किशोरवयीन पोर्तुगीज ठरला.
विश्वचषक आणि यूरो कप अशा दोन्ही स्पर्धांमध्ये २०हून अधिक सामने खेळणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिला युरोपियन फुटबॉलपटू ठरला.