किच्छा (उत्तराखंड) : टीम इंडियाचा भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या चांगल्या फॉर्मात आहे. आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत याने दुुसऱ्या स्थानावर झेप घेतली. क्रिकेटच्या मैदानावर कोट्यधीश जसप्रीत बुमराहची कामगिरी सर्वोत्तम होत असली, तरी त्याच्या घरची स्थिती मात्र हलाखीची आहे. जसप्रीत बुमराहचे कुटुंब उत्तराखंडमधील उधमसिंगनगरमध्ये अतिशय कष्टात दिवस काढत आहे. उधमसिंगनगरमधील एका छोट्या खेळातील चंद्रमोळी झोपडीत वास्तव्यास असलेले संतोषसिंग बुमराह यांनी आपण जसप्रीत बुमराहचे आजोबा असल्याचा दावा केला आहे. ८४ वर्षांचे संतोषसिंग हे दिव्यांग मुलासह राहतात. संतोषसिंग यांची परिस्थिती इतकी हलाखीची आहे, की त्यांना या वयातदेखील रिक्षा चालवून स्वत:सह दिव्यांग मुलाचा उदरिनर्वाह करावा लागतो. १५ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे संतोषसिंग यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. ‘हातावर कमविणे आणि पानावर खाणे’ हा त्यांच्या आयुष्याचा दिनक्रम बनला. संतोषसिंग बुमराह अगदी ऐशोआरामात गुजरातमध्ये राहायचे. त्यांचा मुलगा आणि जसप्रीत बुमराहचे वडील जसवीर बुमराह यांचे अहमदाबादमध्ये तीन कारखाने होते. बुमराह कुटुंब १७ वर्षांपूर्वी अतिशय सधन होते. मात्र २००१ मध्ये जसवीर बुमराह यांचे निधन झाले. यानंतर बुमराह कुटुंब मोठ्या संकटात सापडले . श्रीमंतीला उतरती कळा लागली. १७ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आणि त्यानंतर निर्माण झालेली आर्थिक विवंचना या आठवणींबद्दल बोलताना संतोषसिंग बुमराह यांचे डोळे पाणावतात. जसवीर बुमराह यांच्या मृत्यूनंतर बुमराह कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. बँकांच्या कर्जामुळे कारखाने विकण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळेच संतोष बुमराह सर्व काही विकून उत्तराखंडला आले. वृद्ध संतोष बुमराह यांची आता एकच इच्छा आहे. त्यांना नातू जसप्रीत बुमराहची भेट घ्यायची आहे. कर्जाच्या डोंगरामुळे कारखाने विकावे लागल्यावर संतोष बुमराह उत्तराखंडला आले. मात्र जसप्रीत बुमराहची आई जसप्रीतला घेऊन स्वतंत्र राहू लागली. आता ८४ वर्षे वयाच्या संतोष बुमराह यांना जसप्रीत बुमराहला भेटून त्याला मिठी मारण्याची तीव्र इच्छा आहे. जसप्रीतचे बालपणातील फोटो आजोबांनी अद्याप जपून ठेवले आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल ते कोणालाही दोष देत नाहीत. ‘जे नशिबात होते, ते झाले,’ असे त्यांचे मत आहे. जसप्रीतचे आजोबा आणि त्याच्या काकांना जसप्रीतला भेटायचे आहे. आपल्या कुटुंबाचे नाव नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा जसप्रीत येऊन आपल्याला भेटेल, अशी आशा त्यांना आहे. दरम्यान संतोषसिंग यांच्या आर्थिक विवंचनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बोलावून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. संतोषसिंग यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यानंतर मदत केली जाईल. मुख्यमंत्री निधीतूनदेखील त्यांना मदतीचा प्रयत्न करू, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
कोट्यधीश बुमराहचे आजोबा विपन्नावस्थेत
By admin | Published: July 04, 2017 1:48 AM