ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - कर्णधार विराट कोहलीबरोबर मतभेद झाल्यामुळे अनिल कुंबळेंच्या प्रशिक्षकपदावर टांगती तलवार असताना भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे यांचे समर्थन केले आहे. अनिल कुंबळे मेहनती असून तुम्ही त्याच्याबरोबर नेहमीच क्रिकेटबद्दल बोलू शकता. शेवटच्या चेंडूपर्यंत पराभव मान्य न करण्याची कुंबळेंची वृत्ती आहे. कुंबळे कठोर आहेत. ते प्रतिभेपेक्षा मेहनतीला जास्त प्राधान्य देतात. एक प्रशिक्षक म्हणून ते भारतीय क्रिकेमध्ये अनेक चांगले बदल घडवू शकतात असे हरभजन सिंग म्हणाला. तो आज तक वृत्तवाहिनीच्या क्रिकेट कॉनक्लेव्हमध्ये बोलत होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून या प्रक्रियेमध्ये कुंबळे यांना थेट प्रवेश आहे. हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे 15 वर्ष एकत्र क्रिकेट खेळले आहेत. मी 15 वर्ष त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो पण एकदाही आमच्यात भांडण झाले नाही. ते एक हुशार गोलंदाज असून नेहमी तुमची मदत करायला तयार असतात. मी आज जे मिळवलेय त्यामध्ये त्यांचे योगदान आहे असे हरभजनने सांगितले.
मी विराट कोहलीच्या संघात नसल्यामुळे संघात काय चालले आहे ते मी सांगू शकत नाही. कुंबळेंपासून कोणाला अडचण असेल तर त्याने कुंबळे बरोबर जाऊन बोलले पाहिजे. कुंबळे एक आदरणीय व्यक्ती असून त्यांचा कोणाबरोबर वाद असूच शकत नाही हे मी माझ्या अनुभवावरुन सांगतो. समस्या असेल तर ती चर्चा करुन सोडवली पाहिजे असे हरभजन म्हणाला.