ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 7 - कसोटी जिंकण्यासाठी २० बळी घेण्यावर विशेष भर देत टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी बांगला देशविरुद्ध एकमेव कसोटीत विजयी लय कायम राखू, असा विश्वास व्यक्त केला आहे. इंग्लंड विरुद्ध जी विजयी घोडदौड सुरू झाली ती पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करीत कुंबळे पुढे म्हणाले, मायदेशात नुकतीच संपलेली इंग्लंड विरुद्धची मालिका यशस्वी ठरली. विजयाची परंपरा पुढेही कायम राहील. यानंतर अनेक कसोटी मालिका खेळायच्या असल्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना इंग्लंड आणि त्याआधीचा न्यूझीलंड विरुद्धचा विजयी अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न असेल. बांगलादेशविरुद्ध विजयासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील, असे वाटत नसल्याचे सांगून कुंबळे म्हणाले, विजयासाठी काही वेगळे करण्याची गरज नाही. आधी ज्या ताकदीने विजय मिळविले ती ताकद पुन्हा झोकून दिल्यास विजय आमच्या बाजूने येईल, यात शंका नाही. बांगला देश संघ खेळात फार प्रगत झाला आहे. न्यूझीलंडमध्ये निकाल थोडा वेगळा लागला तरी बांगलादेशची कामगिरी कमकुवत नव्हती. आम्ही प्रतिस्पर्धी संघाचा सन्मान करतो. बांगला देश संघात दर्जेदार व अष्टपैलू खेळाडू आहेत.त्यामुळे सामना रंगतदार होईल. आमच्या वेगवान गोलंदाजांनी अलीकडे जी यशस्वी कामगिरी केली त्यावरून प्रतिस्पर्धी संघाचे २० गडी बाद करण्यात यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. इंग्लंड विरुद्ध फिरकीचा बोलबाला राहिला, असे बोलले जाते. पण कुंबळे यांच्या मते, वेगवान गोलंदाजांची कामगिरी नजरेआड करता येणार नाही. कधी वेगवान तर कधी फिरकी माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता आले. एकूणच २० गडी बाद करण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांमध्ये आली आहे. बांगलादेशविरुद्ध काय डावपेच राहतील, या प्रश्नाच्या उत्तरात कुंबळे म्हणाले, हे सत्रातील खेळावर अवलंबून राहील. कसोटीत प्रत्येक सत्रातील खेळ सामन्याचा निकाल फिरवीत असल्याने आम्ही सत्रानुसार डावपेच आखू. एक कसोटी असली तरी पाच दिवसांत काय काय घडू शकते, यावर बारकाईने लक्ष असेल.
विजयी लय कायम राखू : कुंबळे
By admin | Published: February 07, 2017 8:03 PM