नवी दिल्ली : भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याने कराराच्या पुनर्रचनेविषयी बीसीसीआयला १९ पानांचा प्रस्ताव दिला होता. त्यात वेतनाला जास्त महत्त्व देण्यात आले आणि त्याने मुख्य प्रशिक्षकाची कमाई ही कर्णधाराच्या उत्पन्नाच्या ६0 टक्के व्हायला हवी, अशी मागणी केली होती. आयपीएलपासून राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या कमाईचेदेखील समर्थन केले होते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे कुंबळेने त्याच्या दस्तावेजात म्हटले आहे.कुंबळेने त्याचबरोबर खेळाडूंच्या केंद्रीय करारातील २0 टक्के हिस्सा ‘व्हेरिएबल पे’ व्हायला हवा आणि जो त्यांच्या फिटनेसवर आधारित असायला हवा, अशी सूचनाही केली होती. याविषयीचे दस्तावेज कुंबळेने २१ मे रोजी आयपीएल फायनलदरम्यान प्रशासकांच्या समितीला (सीओए) सोपवले होते.‘भारतीय क्रिकेट संघाशी निगडित लोकांचे वेतन आणि कराराची पुनर्रचना’ असे शीर्षक असणाऱ्या दस्तावेजाच्या १२ व्या पानात कुंबळेने सहायक स्टाफच्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कुंबळेने संजय बांगरचे वेतन एक कोटीपासून अडीच कोटी करण्याचे, तर श्रीधर याला एक कोटीच्या जागी ७५ लाख रुपये मिळावेत अशीही सूचना केली आहे. सीओएचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या आयपीएलपासून होणाऱ्या कमाईचा मुद्दा उचलला होता.
प्रशिक्षकांच्या वेतनवाढीचा कुंबळे यांचा होता प्रस्ताव
By admin | Published: June 24, 2017 2:02 AM