ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवरचा दबाव वाढला आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल अन्यथा कोहलीला परिणाम भोगावे लागतील, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
संघ निवडताना निवड समिती कर्णधाराचे मत विचारात घेते. प्रत्येक कर्णधार त्याच्या पसंतीच्या खेळाडूंना प्राधान्य देतो तसेच प्रशिक्षकाच्या बाबतीतही असते. कोहलीने कुंबळेच्या बाबतीत कर्णधार म्हणून आपले वजन वापरले. त्यामुळे त्यांना प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावे लागले. आता सर्व काही कोहलीच्या मनासारखे घडले असले तरी, त्याच्यावरची जबाबदारी दुप्पटीने वाढली आहे. त्याला आता परफॉर्मन्स करुन दाखवावाच लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर लंडनमध्ये बीसीसीआय पदाधिकारी आणि सल्लागार समितीमध्ये बैठक झाली. यावेळी कोहलीने कुंबळेंबरोबर मतभेद असल्याचे मान्य केलं. कुंबळेबरोबर काम करायला भाग पाडलं जाणार असेल तर आपण तयार आहोत असंही कोहलीने या बैठकीत स्पष्ट केलं होते. जेव्हा सल्लागार समितीचे सदस्य सचिन, सौरव, लक्ष्मण कुंबळेला भेटले तेव्हा त्याने आपल्याला विराटपासून कोणतीही अडचण नसून, आपण त्याच्यासोबत काम करायला तयार आहोत असं सांगितलं.
बैठकीनंतर सल्लागार समितीने अॅडमिनिस्ट्रेशन कमिटीसमोर संपूर्ण प्रकरण मांडलं. भविष्यात जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं? असा सवाल उपस्थित झाला. तसंच विराट आणि कुंबळे या दोघांमधील वादाचं हे प्रकरण इतक्या टोकापर्यत का पोहचू दिलं. वादाच्या सुरुवातीलाच बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी वाद मिटविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत, असे सवाल सीओएने उपस्थित केले. सल्लागार समितीने अनिल कुंबळे यांचं प्रशिक्षक पद कायम ठेवावं यासाठी प्रयत्न केले होते पण विराटला कुंबळेंबद्दल तक्रारी असल्याने त्यांनी सन्मानपूर्वक पद सोडण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनूसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर अनिल कुंबळे भारतीय संघाच्या काही खेळाडूंशी बोलले होते. वाइड आणि नोबॉल्स टीमला किती भारी पडले, हे कुंबळे यांनी टीमला सांगितलं. गोलंदाजांनी योग्य आणि ठरलेल्या पद्धतीने गोलंदाजी केली नाही, असं मत कुंबळे यांनी मांडलं होतं. त्यांच्या या मताला त्यावेळी विराट कोहलीने सहमती दर्शविली होती. सामन्याच्या आधी सराव करताना जी स्ट्रॅटेजी ठरविण्यात आली होती तीच मैदानात वापरायला हवी होती, असं मत त्यावेळी विराटने व्यक्त केलं होतं. कोच कुंबळेंचं म्हणणं तेव्हा विराटने सकारात्मकपणे घेतलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच अनिल कुंबळे यांनी खेळाडुंशी संवाद साधला होता. मोठी मॅच हारल्यानंतर त्यांनी खेळाडुंशी लगेच संवाद साधायला नको होता, तिथूनच वादाला सुरूवात झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.