लंडन : भारतीय संघाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी सचिन तेुंडलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने(सीएसी) वेळ वाढवून मागितला आहे.बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि आयपएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्यासह अनेक सिनियर सदस्य कुंबळे यांना घाईघाईने हटविण्याच्या विरोधात आहेत. यामुळे कुंबळे यांचा कोचपदाचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता बळावली. तीन सदस्यीय समितीची काल एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन तास बैठक झाली. समितीने नंतर बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांना माहिती देत नव्या कोचच्या निवडीसाठी आणखी काही वेळ हवा, असे सांगितले. तिघेही कुंबळे यांना हटविण्याच्या विरोधात आहेत. कुंबळे कोचपदी असताना भारताने १७ पैकी १२ सामने जिंकले. दुसरीकडे खन्ना यांनी शुक्ला यांच्याशी चर्चा केल्यानंतर अमिताभ चौधरी यांना पत्र लिहून २६ जून रोजी मुंबईत होणाऱ्या विशेष आमसभेपर्यंत कोच निवड प्रक्रिया थांबविण्याचा आग्रह केला. याचा अर्थ असा की कुंबळे यांना चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपताच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जावे लागेल. कुंबळे जाणार नसतील तर ही जबाबदारी सहायक कोच संजय बांगर यांच्याकडे सोपविली जाईल.दरम्यान बीसीसीआयचे संचालन करणाऱ्या प्रशासकीय समितीने देखील(सीओए) क्रिकेट सल्लागार समितीने निवडलेल्या कोचच्या नावाला आमचा विरोध असणार नाही असे स्पष्ट केले. सीएसीच्या निर्णयास आमचा विरोध असण्याचे कारण नाही, असे सीओएच्या सूत्रांनी सांगितले. विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील सीओए कुंबळे यांना हटविण्याच्या बाजूने नाही. तथापि सीएसीचा निर्णय अंतिम असेल, असे सोओएचे मत आहे.(वृत्तसंस्था)
कुंबळे यांच्या भविष्याचा निर्णय लांबणीवर
By admin | Published: June 10, 2017 6:20 AM