बर्मिंघम : अनिल कुंबळे व विराट कोहली यांच्या दरम्यान वादाबाबत चर्वितचर्वण सुरू असताना आज, शुक्रवारी मात्र याचा काही प्रभाव दिसला नाही. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कुंबळे यांनी संघाच्या इन्डोअर सरावादरम्यान कर्णधार कोहलीला थ्रोडाऊनचा सराव करविला. भारतीय ड्रेसिंग रुममधील दोन प्रभावी व्यक्तींदरम्यान कथित मतभेद असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तयारी सुरू असताना या दोघांमधील कथित मतभेदाचे वृत्त चर्चेचा विषय ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर कुंबळे व कोहली एकत्र आपल्या कार्याला प्राधान्य देत आहेत, हे चांगले संकेत आहेत. खराब वातावरणामुळे संघाला बाह्यमैदानावर सराव करता आला नाही. आजच्या सराव सत्रात फलंदाजांनी जास्तीत जास्त वेळ थ्रोडाऊनवर सराव केल्याचे दिसून आले. एकत्र असलेल्या चार नेट््समध्ये सरावादरम्यान सर्वांची नजर पहिल्या नेटवर लागली होती. तेथे कोहली एकाग्रचित्ताने फलंदाजी करीत होता. कुंबळे कर्णधाराला थ्रोडाऊनचा सराव देत होते, हे या सत्राचे विशेष आकर्षण होते. कोहलीने सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने फलंदाजीचा सराव केला. सत्रादरम्यान त्यांच्यादरम्यान मतभेद आहेत, असे निदर्शनास आले नाही. ड्राईव्हचा सराव केल्यानंतर कोहलीने काही स्केअर आॅफ द विकेट फटके खेळण्याचा सराव केला. कुंबळेने कर्णधारासोबत जवळजवळ २० मिनिटे वेळ घालविल्यानंतर दुसऱ्या नेट््सकडे मोर्चा वळवला. या सराव सत्रात फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर युवराज सिंगला थ्रोडाऊनचा सराव देत होते. कुंबळेने आपली ड्रील पूर्ण केल्यानंतर बांगर व त्यांनी नेट््स बदलल्या. व्हायरल फिव्हरमुळे दोन सराव सामन्यांना मुकलेला युवराज भारत व पाकिस्तान यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित लढतीपूर्वी लय शोधण्यास प्रयत्नशील आहे. एका अन्य नेट््समध्ये रोहित शर्माने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी व स्पेशालिस्ट ‘राघवेंद्र’ यांच्या थ्रोडाऊनवर सराव केला. दरम्यान, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने खेळाडूंची भेट घेतली नाही. सुरुवातीला गांगुलीने खेळाडूंसोबत चर्चा केल्याचे वृत्त मीडियामध्ये आले होते. (वृत्तसंस्था)
कुंबळेच्या थ्रोडाऊनवर कोहलीचा सराव
By admin | Published: June 03, 2017 12:59 AM