नवी दिल्ली : आयलीगमधील नव्या बदलाला विरोध दर्शवून माघार घेणाऱ्या गोव्यातील तिन्ही क्लबच्या अट्टहासी कृतीचा खरपूस समाचार घेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष (एआयएफएफ) प्रफुल्ल पटेल यांनी कठोर शब्दांत टीका केली. नवे बदल स्वीकारून खेळण्याची क्षमता या तिन्ही क्लबमध्ये नव्हती. फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा ते केवळ बहाणेबाजी करीत असल्याचे टीकास्त्र पटेल यांनी सोडले.गोव्यातील तिन्ही संघांचे मालक शिवानंद साळगावकर, श्रीनिवास डेम्पो आणि पीटर वाझ (स्पोर्टिंग क्लब डी गोवा) यांनी एकत्र येऊन आयलीगच्या पुनर्गठनाला कडाडून विरोध केला. आयएसएलला आघाडीच्या लीगचा दर्जा आणि आयलीगला निम्नस्तर दर्जा देण्याच्या एआयएफएफच्या कृतीला तिन्ही मालकांचा विरोध आहे. यापैकी कुणाचेही नाव न घेता पटेल म्हणाले, ‘‘ज्या क्लबनी माघार घेतली ते फुटबॉलमध्ये गुंतवणूक करीत नव्हतेच. या क्लबमध्ये गुंतवणुकीची क्षमता नव्हती. त्यामुळे अन्य कारणे पुढे करून ते दुसऱ्यावर खापर फोडत आहेत. आयलीग अद्यापही देशत अव्वल दर्जाची स्पर्धा आहे. एआयएफएफ याच स्पर्धेला अधिक प्राधान्य देते. यंदा आयलीग आणि आयएसएलचे विलीनीकरण होणार नाही. जेव्हा केव्हा ते होईल, तेव्हा आयएसएलचे विलीनीकरण आयलीगमध्येच होईल, अशी मी हमी देतो.’’(वृत्तसंस्था) इंडियन वुमेन्स लीग सुरूभारतात महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी अ.भा. फुटबॉल महासंघाने आज इंडियन वुमेन्स लीग (आयडब्ल्यूएल) सुरू केली. यंदा सहा संघ सहभागी झाले आहेत. २८ जानेवारीपासून पहिल्या सत्राची सुरुवात होत आहे. सहभागी संघात मिझोरमचा आयजोल फुटबॉल क्लब, पुद्दुचेरी येथील जेपियार, कटकचा रायझिंग स्टुडंट क्लब, मणिपूर येथील ईस्टर्न स्पोर्टिंग युनियन, महाराष्ट्रातील पुणे सिटी क्लब यांचा समावेश आहे. नऊ राज्यांतील २० संघांमध्ये पात्रता फेरी खेळविण्यात आली होती; पण अन्य संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्रता गाठू शकले नाहीत. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘‘भारतात महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही लीगची सुरुवात केली. आम्ही देशातील ५० टक्के महिलांना संधी देऊ इच्छितो. भारतीय महिला फुटबॉल संघ जगात सध्या ५४व्या आणि पुरुष १२९व्या स्थानावर आहे. अशा वेळी पुरुषांच्या तुलनेत आमच्या महिला संघाकडे विश्वचषकाची पात्रता गाठण्याची अधिक संधी आहे. महिला फुटबॉलचा पुढील विश्वचषक २०१९ होणार असून, आमच्या संघाला यात सहभागी होण्याची उत्तम संधी असेल.’’
लीगमधून माघारलेल्या गोव्याच्या संघांमध्ये क्षमतेचा अभाव : पटेल
By admin | Published: January 25, 2017 12:40 AM