लंडन : भारताचा युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मलेशियाचा प्रतिस्पर्धी आणि सध्याचा विजेता ली झी जिया याचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात पराभव करीत प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. वीस वर्षांच्या लक्ष्यने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या जियावर २१-१३, १२-२१, २१-१९ अशी तीन गेममध्ये मात केली.पहिला गेम सहज जिंकत लक्ष्यने सामन्यात आघाडी घेतली होती. मात्र ली झी जियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दुसरा गेम खिशात घातला. निर्णायक गेममध्ये लक्ष्य एकवेळ १६-१८ ने माघारला होता. त्याला बाहेरचा रस्ता धरावा लागतो की काय असे वाटत असतानाच त्याने सरळ चार गुणांची कमाई करीत सामन्यावर वर्चस्व गाजविले. या विजयासोबतच प्रकाश नाथ, प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्यानंतर ऑल इंग्लंडच्या अंतिम फेरीत दाखल झालेला तो चौथा भारतीय ठरला. पदुकोण आणि गोपीचंद यांनी या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते. महिलांमध्ये २०१५ ला सायना नेहवाल ही स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाली होती.लक्ष्य गेल्या सहा महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. डिसेंबरमध्ये जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक पटकाविल्यानंतर त्याने यावर्षी जानेवारी महिन्यात इंडिया ओपनच्या रूपात पहिले सुपर ५०० जेतेपद पटकाविले होते. तसेच मागच्या आठवड्यात जर्मन ओपनचा लक्ष्य उपविजेता ठरला.दुसरीकडे गायत्री गोपीचंद-ट्रिसा जॉली या भारतीय जोडीने कोरियाची दुसरी मानांकित जोडी ली सोही- शीन सियुंगचान यांच्यावर विजय नोंदवून महिला दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन: लक्ष्य सेन अंतिम फेरीत; ली जियावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 9:45 AM