पर्थ : आॅस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टिन लँगरने वाकासोबतचा प्रशिक्षकपदाचा करार आणखी दोन वर्षांनी वाढवला आहे. त्यामुळे त्याची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची शक्यता मावळली आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी लँगरच्या नावाची चर्चा होती. विश्वकप स्पर्धेनंतर झिम्बाब्वेचे डंकन फ्लेचर यांचा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त आहे.लँगर म्हणाला,‘भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणे मानाची बाब होती, पण आंतरराष्ट्रीय संघासोबत सातत्याने प्रवास करावा लागत असल्यामुळे कुटुंबाला वेळ देता आला नसता.’वेस्टर्न आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने मंगळवारी जाहीर केले की, लँगरने प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २०१७-१८ च्या मोसमापर्यंत वाढवला आहे.आॅस्ट्रेलियातर्फे १०५ कसोटी व ८ वन-डे सामन्यांत प्रतिनिधित्व करणारा लँगर म्हणाला,‘त्याचे नाव इंग्लंड व भारत यांच्यासारख्या मोठ्या संघांसोबत जुळल्यामुळे मदत झाली आहे.’लँगर पुढे म्हणाला,‘आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मिळणे मानाची बाब होती, पण त्यामुळे कुटुंबाला वेळ देता आला नसता. वेस्टर्न आॅस्ट्रेलिया व आॅस्ट्रेलिया क्रिकेटसाठी मला बरेच काही करायचे आहे. आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास इच्छुक आहे, पण भविष्यात संधी व वेळ यावर बरेच काही अवलंबून राहील.’ (वृत्तसंस्था)
लँगरची वाकाच्या प्रशिक्षकपदाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2015 1:32 AM