मेलबर्न : असेला गुणरत्नेची अर्धशतकी खेळी तसेच अनुभवी चमारा कापुगेदराने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या चौकारामुळे श्रीलंकेने रोमहर्षक अशा पहिल्या टी-२० सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ५ गड्यांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.आॅस्ट्रेलियाने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ८ बाद १६८ धावा उभारल्या. कर्णधार अॅरोन फिंच याने ४३, मायकेल क्लिंगर ३८ आणि ट्रॅव्हिस ३१ यांचे योगदान प्रमुख ठरले. जवळपास वर्षानंतर संघात परतलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने २९ धावांत दोन गडी बाद केले.श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७२ धावा करीत सामना जिंकला. गुणरत्ने याने ३७ चेंडंूत ५०, दिलशान मुनावीरा ४४ आणि सलामीवीर निरोशन डिकवेलाने ३० धावा केल्या. लंकेला अखेरच्या षटकांत सहा धावांची गरज होती. कापुगेदराने (नाबाद १०) जबाबदारी घेत अॅण्ड्रयू टायच्या अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारला. आॅस्ट्रेलियाकडून एस्टर टर्नर आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गुणरत्नेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. (वृत्तसंस्था)
लंकेचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय
By admin | Published: February 18, 2017 1:08 AM