पुणे : ‘आयपीएल’च्या या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला यशासाठी खूप झुंजावे लागत आहे. आतापर्यंत झालेल्या ९ पैकी ६ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. अंकतालिकेत पाचव्या स्थानी असलेल्या आरसीबीला पुणे सुपरजायंट्सविरुद्ध शनिवारी जिंकावेच लागणार आहे.भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा पराभव झाल्यास त्यांचा आयपीएलच्या या सत्रातील प्रवास येथेच थांबणार आहे. त्याचबरोबर यांना येथून पुढील सर्व सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सची स्थिती आरसीबीपेक्षा थोडी चांगली आहे. पुण्याने आठपैकी चार सामने जिंकले आहेत. मात्र, पुण्याचा संघही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरला आहे. आरसीबीची कामगिरी कशीही असली तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडे विराट कोहली, ए. बी. डिव्हिलर्स व ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाज आहेत. दुसरीकडे पुण्याचे गोलंदाज बेन स्टोक्स व इम्रान ताहिर यांनाही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. मात्र आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या आरसीबीच्या फलंदाजांना पुणे सुपरजायंट्सचे गोलंदाज अडचणीत आणू शकतात. फलंदाजीत युवा फलंदाज राहुल त्रिपाठीने सहा सामन्यांत २१६ धावा केल्या आहेत. त्याच्या कामगिरीकडेही आरसीबीचे लक्ष असेल. (क्रीडा प्रतिनिधी)