आपिया : सामोआ येथे शुक्रवारी पार पडलेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाने दोन सुवर्णपदकांची भर टाकली. या कामगिरीसह भारताने ९ सुवर्णपदकांसह एकूण १९ पदकांची कमाई करुन स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले.स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने टेनिसमध्ये दोन्ही सुवर्ण पदक जिंकले. विशेष म्हणजे टेनिसमधील पाच सुवर्णपैकी तीन सुवर्ण पदकांवर भारताचे कब्जा करताना आपला दबदबा राखला. अखेरच्या दिवशी झालेल्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम लढतीत शशीकुमार मुकुंद याने आक्रमक खेळाच्या जोरावर स्कॉटलंडच्या इवेन लुम्सडेनचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवून सुवर्ण पदकांवर नाव कोरले. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात मुकुंदने लुम्सडेनला आपला खेळ करण्याची एकही संधी दिली नाही. त्याचवेळी महिला गटात देखील भारताचेच वर्चस्व राहिले. धृती वेणूगोपालने सुध्दा तुफान खेळ करताना स्पर्धेत आश्चर्यकारक आगेकूच केलेल्या नामिबियाच्या लेसेडी जेकब्सचा ६-३, ६-० असा फडशा पाडला. पहिल्या सेटमध्ये थोडाफार प्रतिकार दाखवलेल्या लेसेडीचा यानंतर दुसऱ्या सेटमध्ये धृतीच्या धडाक्यापुढे निभाव लागला नाही. या स्पर्धेत भारताच्या एकूण २५ खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. तसेच जगभरातील ४० देशांतीप १४ ते १८ वर्ष वयोगटातील खेळाडूंनी नऊ खेळांच्या विविध १०७ स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शवला. (वृत्तसंस्था)१९ पदकांची केली कमाईअखेरच्या दिवशी दोन सुवर्णपदकांची कमाई करुन भारताने या स्पर्धेत ९ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण १९ पदके पटकावली. या कामगिरीसह भारताने स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. आॅस्टे्रलियाने तब्बल २४ सुवर्ण आणि प्रत्येकी १९ रौप्य व कांस्य अशी एकूण ६२ पदकांची लयलूट करताना स्पर्धेवर वर्चस्व राखले. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकाने १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १५ कांस्य अशी एकूण ३५ पदकांची कमाई करुन द्वितीय स्थान पटकावले. तर इग्लंडने १२ सुवर्णांसह एकूण ४४ पदक जिंकताना तृतीय स्थानावर कब्जा केला.
अखेरच्या दिवशी भारताला ‘डबल गोल्ड’
By admin | Published: September 12, 2015 3:17 AM