चेन्नई : पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये आलेल्या कोरियाच्या हियोन चुंग याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खळबळजनक विजयाची नोंद केली. त्याने गत उपविजेत्या बोर्ना कोरिच याला सरळ सेटमध्ये हरवले.जागतिक मानांकनात ४८ व्या क्रमांकावर असलेला क्रोएशियाचा कोरिच आपली सर्व्हिस आणि फोरहँडच्या फटके खेळताना त्रासलेला दिसत होता. याचा फायदा घेत कोरियन खेळाडूने त्याला ६-३, ७-५ असे हरवले.
कोरिचला गेल्या सत्रात घोट्याची दुखापत सतावत होती. परंतु तो म्हणाला, आजच्या पराभवाचे हे कारण नाही. चुंगची पुढील लढत आता इस्त्रालयच्या डुडी सेला याच्याशी होईल. डुडीने बोस्निया-हर्जेगोविनाच्या दामिर झुमहुर याला ६-२, ६-२ असे हरवले. अन्य एका पात्रता फेरीच्या लढतीत स्लोवाकियाच्या जोजेफ कोवालिक दुसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने पोर्तुगालच्या एलियास गस्ताओ याला दोन तास २0 मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-७, ६-४,६-२ असे हरवले. कोवालिक पुढच्या फेरीत अव्वल दावेदार मारिन सिलिच याच्याशी लढणार आहे.