ख्रिस गेलची बॅट तळपली की गोलंदाजांना ‘सळो की पळो’ होते. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत तर अक्षरश: धो-धो बरसतात. विश्वचषकात मंगळवारी पहिल्यांदा गेलची बॅट जबरदस्त तळपली. त्याने अविस्मरणीय दुहेरी शतकाची नोंद केली. १९८३ च्या विश्वषचकात कपिलदेवने देखील झिम्बाब्वेविरुद्ध १७५ धावा ठोकल्या, तर २०१५ साली गेलपुढेही प्रतिस्पर्धी संघ झिम्बाब्वे हाच होता. दोन्ही सामन्यांतील स्थिती मात्र वेगवेगळी होती. कपिलने ठोकलेल्या १७५ धावा १९९६ च्या विश्वचषकापर्यंत सर्वोत्तम होत्या. द. आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन याने यूएईविरुद्ध १८८ धावा ठोकून हा विक्रम मोडला. कर्स्टन यांचा विक्रम मंगळवारी गेलने २१५ धावा ठोकून मोडला.तुलनात्मकदृष्ट्या ख्रिस गेलसाठी परिस्थिती सोपी होती. सध्याच्या क्रिकेटमधील नियमांत झालेले बदल फलंदाजांच्या पथ्यावर पडणारे आहेत. बदलांमुळे सध्या सर्कलबाहेर एक फिल्डर कमी असतो. यामुळे गोलंदाजांनादेखील शक्कल लढवीत चेंडू टाकणे भाग पडते. दुसरे कारण टी-२० क्रिकेट हे देखील आहे. क्रिकेटच्या या प्रकारामुळे फलंदाज जोखीम असलेले फटके खेळण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हवेत फटके मारण्यास आता कुणीही घाबरत नाही. असेच फटके नेट्समध्येही मारले जातात.
नियमातील बदलांमुळे बनले ‘बादशाह’!
By admin | Published: February 25, 2015 1:14 AM