मुंबई : भारताचा संकटमोचक राहिलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणची आॅस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवली गेलेली २८१ धावांची खेळी ही गेल्या ५0 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी म्हणून गणली गेली आहे.हैदराबादच्या या शैलीदार फलंदाजाने भारत पहिल्या डावात २७४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर ही खेळी केली होती. खेळाडू, समालोचक आणि पत्रकारांनी केलेल्या मतदानात लक्ष्मणची ही खेळी गेल्या ५0 वर्षांतील सर्वोत्तम खेळी असल्याचे स्पष्ट झाले. ईएसपीएनच्या डिजिटल पत्रिका क्रिकेट मंथलीच्या जानेवारी अंकात या मतगणनेच्या आधारावर ५0 वर्षांतील कामगिरींचा उल्लेख करण्यात आला आहे.लक्ष्मणने भारताच्या पहिल्या डावाच्या १७१ धावसंख्येत सर्वाधिक ५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या जादुई कामगिरीने जगभरातील क्रिकेटप्रेमींनी मंत्रमुग्ध केले होते. त्याने राहुल द्रविड (१८0) याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ३७६ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली होती. आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने या डावाचे स्मरण करताना म्हटले की, ‘मी पायाने झालेल्या निशाण्यावर गोलंदाजी करीत होतो आणि लक्ष्मण तो चेंडू कव्हर अथवा मिडविकेटवर खेळत होता. त्या वेळेस गोलंदाजी करणे कठीण होते.’रिकी पाँटिंग या खेळीविषयी म्हटला की, ‘त्याने लेगसाईडवर मारलेल्या फटक्याने आम्ही सर्व आश्चर्यचकित होतो. आम्ही त्याच्यासाठी जवळपास दोन दिवस गोलंदाजी केली आणि तोपर्यंत त्याला आम्ही बाद करू शकत नाही, असे वाटत होते.’(वृत्तसंस्था)बॉर्डर-गावसकर चषक कसोटी क्रमांक १५३५भारत दुसरा डाव : व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ६३१ मिनिट, ४५२ चेंडू, ४४ चौकार, २८१ धावा.या कसोटीत भारताचा पहिला डाव १७१ धावांत संपुष्टात आल्यानंतर आॅस्ट्रेलियाकडून फॉलोआॅन मिळाला होता. (आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या २४५ धावा झाल्या होत्या.) दुसऱ्या डावांत भारताने ७ बाद ६५७ धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने या डावात १८० धावांची खेळी केली होती.
लक्ष्मणची ५0 वर्षांतील सर्वोत्तम खेळी
By admin | Published: January 04, 2016 11:55 PM