- सुनील गावसकर लिहितात...यंदाच्या आयपीएलच्या पर्वात संघाच्या कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य दखल घेण्यासारखे आहे. कर्णधारांचा त्यांच्या संघावरील प्रभाव प्रशंसेस पात्र आहे. अचूक चाल रचून किंवा स्वत: उल्लेखनीय योगदान देत संघसहकाऱ्यांपुढे ते उदाहरण सादर करीत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये खेळ वेगाने बदलत असल्यामुळे कर्णधाराला विशेष काही करता येत नसल्याचे निदर्शनास येते. यंदाच्या मोसमात मात्र चणाक्ष नेतृत्वामुळे कर्णधार सामना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कर्णधार कधी गोलंदाजीमध्ये बदल करीत किंवा क्षेत्ररक्षणात बदल करीत किंवा फलंदाजी क्रमामध्ये बदल करीत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने तीन फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर, संघ अडचणीत असताना शानदार फलंदाजी करीत संघाला चमकदार विजय मिळवून दिला. त्याआधी, त्याने गोलंदाजीमध्ये अचूक बदल करीत फॉर्मातील आक्रमक फलंदाजांचा समावेश असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला केवळ १२८ धावांत रोखण्याची कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानावर आहेत; पण गंभीरने गोलंदाजीमध्ये अचूक बदल करीत त्यांच्यासह सनरायझर्सच्या अन्य फलंदाजांना जम बसविण्याची संधी दिली नाही. स्टीव्ह स्मिथनेही शानदार नेतृत्व करीत पुणे संघाला अंतिम फेरी गाठून दिली. त्याला महेंद्रसिंह धोनीची योग्य साथ लाभली हे वेगळे सांगायला नको. यष्टिरक्षणाची भूमिका बजावताना धोनी क्षेत्ररक्षकांना योग्य जागेवर तैनात राहण्याचा सल्ला देत होता. डेव्हिड वॉर्नरची कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार व उपकर्णधार खेळाबाबत अचूक विचार करीत आहेत, ही आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चांगली बाब आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना फलंदाजांची कामगिरी उंचावेल, अशी मुंबई इंडियन्स संघाला आशा आहे. रोहित शर्माला चुकीच्या पद्धतीने बाद ठरविण्यात आले असले, तरी फलंदाजी क्रमामध्ये केलेला बदल मुंबई संघासाठी लाभदायक ठरला नाही. बाद फेरीच्या लढतींमध्ये अशा प्रकारच्या निर्णयामुळे सामन्याचे चित्र बदलू शकते आणि मुंबई संघाबाबत तेच घडले. मुंबई संघाला डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. डावाच्या अखेरच्या टप्प्यात सामना मुंबई संघापासून दूर गेला. बुमराहने अखेरचे दोन चेंडू अप्रतिम यॉर्कर टाकले, पण त्यापूर्वी त्याच्या त्या षटकात दोन षटकार लगावल्या गेले होते. यंदाच्या मोसमात साखळी फेरीमध्ये मुंबईने दोन्ही लढतींमध्ये कोलकाता संघाचा पराभव केला आहे, पण कोलकाता संघाने त्यानंतर चमकदार कामगिरी करीत आगेकूच केली आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान शुक्रवारी खेळल्या जाणारी लढत चुरशीची होईल. (पीएमजी)
कर्णधारांनी नेतृत्व कौशल्याने छाप सोडली
By admin | Published: May 19, 2017 2:49 AM