सिडनी : सध्या दुखापतग्रस्त स्टार फलंदाज मायकल क्लार्क यांच्याकडे आगामी वन-डे विश्वचषकासाठी आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे; मात्र तत्पूर्वी त्याला आपले फिटनेस सिद्ध करावे लागणार आहे़ कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन याला मात्र या संघात स्थान मिळू शकले नाही़आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित विश्वचषक १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे़ विश्वचषकासाठी घोषित कांगारू संघच भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे़ ही तिरंगी मालिका १६ जानेवारीपासून खेळविण्यात येणार आहे़ आॅस्ट्रेलियाचे राष्ट्रीय निवडकर्ते रॉड मार्श म्हणाले, विश्वचषकासाठी क्लार्कचीच कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे; मात्र त्याआधी त्याला तंदुरुस्त चाचणीला सामोरे जावे लागेल़ जर विश्वचषकापर्यंत क्लार्क तंदुरुस्त झाला नाही, तर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जॉर्ज बेली याच्याकडे सोपविण्यात येईल़ आॅस्ट्रेलिया संघात झेविअर डोहर्टी अनुभवी फिरकी गोलंदाज असल्यामुळे नॅथन लियॉनला संधी मिळाली नाही, असेही मार्श यांनी सांगितले़ क्लार्क मुकण्याची शक्यता आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याला आॅस्ट्रेलियन निवड समितीने फिटनेस सिद्ध करण्यासाठी अल्टीमेटम दिले आहे़ दिलेल्या मुदतीत फिटनेस सिद्ध न केल्यास क्लार्कला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे़ मात्र त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत फिटनेस सिद्ध करण्याची मुदत दिली आहे़ (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया संघ पुढीलप्रमाणे : माईकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पेट कमिन्स, झेविअर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन, जोश हेजलवूड, मिशेल जॉन्सन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर व शेन वॉटसऩ
विश्वचषकासाठी क्लार्ककडे नेतृत्व
By admin | Published: January 12, 2015 2:56 AM