नवी दिल्ली : भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस हा दुहेरीतील मोठ्या स्टारपैकी एक आहे. तसेच टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी तो आहे, असे मत दुहेरी सामन्यातील विजयासह स्पेनला पुन्हा एकदा डेव्हिस कपच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवून दिल्यानंतर १४ वेळेसचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदाल याने व्यक्त केले.मार्क लोपेजच्या साथीने लिएंडर पेस आणि साकेत माइनेनी या जोडीचा ४-६, ७-६, ६-४, ६-४ असा पराभव करीत स्पेनला पुन्हा विश्वग्रुपमध्ये स्थान मिळवून दिल्यानंतर नदाल म्हणाला, ‘पेसने सुरेख खेळ केला. आजची रात्र खूप सुरेख होती. येथे त्याच्या देशात त्याबरोबर खेळणे अप्रतिम आहे. तो दुहेरीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक आणि खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याविरुद्ध खेळणे चांगला अनुभव होता. ही लढत चुरशीची होती. ते चांगले खेळले; परंतु आम्ही विजय नोंदवत विश्व ग्रुपमध्ये पुनरागमन केल्याचा आम्हाला आनंद आहे. आमचे सर्वच खेळाडू अव्वल १00 मध्ये आहेत. त्यामुळे आम्ही तेथे असायलाच हवे आणि हेच आमचे लक्ष्य होते आणि ते आम्ही पूर्ण केले.’भारताच्या कमी रँकिंग असणाऱ्या खेळाडूंसमोर या वेळेसही स्पेनने आपला तुल्यबळ संघ खेळवला होता. त्यात चौथे मानांकीत नदाल आणि १३ व्या मानांकित डेव्हिड फेररचाही समावेश करण्यात आला. >भारतात खेळण्याचा माझा अनुभव चांगला ठरला. तसेदेखील तुम्ही या देशात जास्त वेळेस खेळायला जात नाही. तेथे जाऊन चांगले वाटते. मी भारतात चेन्नई येथे खेळलो आणि गतवर्षी आयपीटीएलमध्ये व यावर्षी आता डेव्हिस चषक स्पर्धेत. येथे खेळणे चांगले वाटते. कारण येथील चाहते खूपच जोशिले आहेत. ही बाब खेळाडू आणि खेळासाठी खूपच चांगली आहे.- राफेल नदाल, टेनिसपटू, स्पेन
लिएंडर जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक : नदाल
By admin | Published: September 19, 2016 4:03 AM