नवी दिल्ली : फिफाच्या आज जाहीर झालेल्या फुटबॉल रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल संघाने गेल्या २० वर्षांत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह ९६ वे स्थान पटकविले आहे. भारताने याआधी १९९३मध्ये ९४व्या स्थानावर झेप घेतली होती. आशियात भारताचा १२ वा क्रमांक असून, इराण अव्वल स्थानावर आहे.राष्ट्रीय संघाच्या सततच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाचे रँकिंग सुधारत असून, गेल्या दोन वर्षांत संघाने ७७ स्थानांची झेप घेतली हे विशेष. संघाने मागच्या १५ पैकी १३ सामन्यांत विजय नोंदविले असून, गेल्या आठ सामन्यांत तर संघ एकदाही पराभूत झालेला नाही. स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी फेब्रुवारी २०१५ला कोचचा पदभार स्वीकारला. त्या वेळी संघाचे रँकिंग १७१ होते. मार्च २०१५ मध्ये संघ १७३ व्या स्थानी घसरला. नंतर संघाने नेपाळवर २-० ने विजय साजरा केला होता.राष्ट्रीय संघाच्या कामगिरीविषयी एआयएफएफ महासचिव कुशाल दास म्हणाले, ‘मकाऊविरुद्ध ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया चषक पात्रता सामन्याआधी ही आनंदी वार्ता आहे.’कॉन्फेडरेशन कप चॅम्पियन; तसेच विश्व चॅम्पियन जर्मनीने ब्राझीलला मागे टाकून अव्वल स्थान पटकविले. अर्जेंटिना तिसऱ्या, पोर्तुगाल चौथ्या आणि स्वित्झर्लंड पाचव्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)भारतीय फुटबॉलसाठी हे मोठे पाऊल आहे. दोन वर्षांआधीचे चित्र बदलले आहे. या सुधारणेमुळे भारतीय फुटबॉलची क्षमता कळू शकते. दुसऱ्या सर्वोत्कृष्ट रँकिंगमध्ये पोहोचल्याबद्दल खेळाडू, कोच, स्टाफ तसेच एआयएफएफ पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष एआयएफएफ.
भारतीय फुटबॉल संघाची ९६ व्या स्थानावर झेप
By admin | Published: July 07, 2017 1:17 AM