आॅस्टीन : मर्सेडीजचा चालक लुईस हॅमिल्टन रविवारी युएस ग्रॅण्ड प्री स्पर्धेचे जेतेपद पटकावून सलग पाचवे आणि सत्रातील दहावे किताब नावावर केले. हॅमिल्टनच्या या ‘ पंच’ तारांकित कामगिरीमुळे त्याने २४ गुणांची कमाई करत विश्व अजिंक्यपद पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्याला संघ सहकारी निकोलस रोजबर्ग याच्याकडून कडवे आव्हान मिळाले, परंतु २४व्या लॅपमध्ये हॅमिल्टनने आघाडी घेत ०४. ३१४ सेकंदाच्या फरकाने किताब पटकावला. पोल पोझिशनवरून सुुरुवात करणाऱ्या २९ वर्षीय हॅमिल्टनने ही शर्यत १ तास ४० मिनिटे ०४ सेकंदात जिंकली, तर रोजबर्गने १ तास ४० मिनिटे ०९ सेकंदात दुसरे स्थान पटकावले. हॅमिल्टनचे हे ३२ वे जेतेपद असून केवळ एक विजय त्याला नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी आवश्यकत आहे. ब्रिटीश चालक निगेल मॅन्सेल याच्या नावावर फॉर्म्युला वनच्या ३२ जेतेपदांची नोंद आहे. या विजयामुळे हॅमिल्टनचे एकूण ३१६ गुण झाले असून त्यापाठोपाठ २९२ गुणांसह रोजबर्ग आहे. यंदाच्या सत्रातील शिल्लक दोन शर्यतीत जेतेपद पटकावण्याचा मानस यावेळी हॅमिल्टन याने व्यक्त केला. तो म्हणाला, मला सर्वोत्तम संघ, गाडी आणि तगडा प्रतिस्पर्धी मिळाल्याने बाजी मारू शकलो. देशाचे नेतृत्व करताना अशी कामगिरी माझ्याकडून होत असल्याचा अभिमान वाटतो. रेड बुल संघाचा आॅस्ट्रेलियन चालक डॅनिएल रिकिआर्डो (१:४०:३०) याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर विलियम्सचा फेलिप मास्सा (१:४०:३१) व वॅल्टेरी बोट्टास (१:४०:३५) यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले. मी सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न केला आणि तिसरे स्थान मिळाल्याचा आनंद असल्याचे मत रिकीआर्डो याने व्यक्त केले. दोन अजिंक्यपद पटकावणारा फेरारी चालक फर्नांडो अलोन्सा याला सहाव्या स्थानावर, तर चार अजिंक्यपदावर कब्जा करणारा रेड बुलचा सेबॅस्टियन वेटल याला सातव्या स्थानावर रहावे लागले.
लुईस हॅमिल्टनची ‘पंच’तारांकित कामगिरी
By admin | Published: November 04, 2014 1:39 AM