फिफा फुटबॉल वर्ल्ड कप पात्रता फेरीतील लढतीत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटूलिओनेल मेस्सीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अर्जेंटिनाच्या संघाने पात्रता फेरीतील सामन्यात बोलिव्हिया संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयात मेस्सीनं मोलाचा वाटा उचलला. एवढेच नाही तर हॅटट्रिकचा डाव साधत त्याने खास इतिहास रचला आहे. या कामगिरीसह मेस्सीनं पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक वेळा हॅटट्रिकचा डाव साधणारे फुटबॉलपटू
आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात लिओनेल मेस्सीनं दहाव्यांदा हॅटट्रिकची किमया साधली. यासह त्याने रोनाल्डोच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोनाल्डोनं देखील आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १० वेळा हॅटट्रिकचा पराक्रम करून दाखवला आहे. फुटबॉल जगतात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक वेळा हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इराणचा दिग्गज अली दाई हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ वेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
मेस्सी बऱ्याच कालावधीनंतर आपल्या देशाच्या संघाकडून उतरला मैदानात गत वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना आणि बोलिव्हिया यांच्यातील सामना ब्यूनस आयर्सच्या एस्टाडिओ मास मुमेंटल अर्थात जे रिवर प्लेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. जूलैनंतर मेस्सी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. याआधी मेस्सी कोपा अमेरिका २०२४ च्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांमध्ये नेहमची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. यात आता हॅटट्रिकच्या शर्यतीत दोघांच्यात एकदम तगडी फाइट पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक गोल करण्यात कोण आहे नंबर वन?
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही या दोघांमध्येच स्पर्धा दिसून येते. यात रोनाल्डो २०१६ सामन्यातील १३३ गोलसह आघाडीवर आहे. वर्ल्ड चॅम्पियन मेस्सीच्या खात्यात ११२ गोलची नोंद आहे. १८९ सामन्यात त्याने इथपर्यंत मजल मारलीये. इराणचा अली दाई इथंही १०९ गोलसह तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते. फुटबॉल जगतात हे तीनच खेळाडू असे आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक गोल करण्याचा पराक्रम नोंदवला आहे.