Lionel Messi Football : जेव्हा फुटबॉलमधील रायव्हलरीची चर्चा होते, तेव्हा ब्राझील आणि अर्जेंटिनाचे नाव सर्वात वर असते. ही रायव्हलरी फक्त मैदानावरच दिसत नाही, तर स्टेडियममधील आणि स्टेडियमबाहेरील चाहत्यांमध्येही पाहायला मिळते. अनेकदा फुटबॉल सामन्यांमध्ये हिंसक संघर्षही पाहायला मिळतो. अशीच घटना ब्राझीलच्या प्रसिद्ध माराकाना स्टेडियममध्ये पहायला मिळाली. ब्राझील पोलिस आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांमध्ये जोरदार वाद झाला.
विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ 2026 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्रता फेरीसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर होता. हा क्वालिफायर सामना मंगळवारी रात्री उभय संघांमध्ये रिओ डी जानेरो येथे खेळला गेला. या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती, कारण लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यातील हा पहिलाच मोठा सामना होता. या सामन्यासाठी सुमारे 78 हजार क्षमतेचे माराकाना स्टेडियम पूर्णपणे भरले होते, मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच गोंधळ उडाला.
पोलिसांनी जोरदार लाठीमार केलासामना सुरू होण्यापूर्वी ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांमध्ये संघर्ष झाला. संघर्ष वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती चिघळली. अर्जेंटिनाच्या चाहत्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली आणि संघर्ष वाढत गेला. अनेक चाहत्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर काही चाहत्यांनी सीट उखडून पोलिसांवर फेकण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या लाठीमारात काही चाहते गंभीर जखमी झाले. एका प्रेक्षकाचे डोकेही फुटले. त्याला स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यात आले.
मेस्सीने मैदान सोडलेपरिस्थिती इतकी बिघडली की, अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझसह काही खेळाडूंनी पोलिसांना रोखण्याचाही प्रयत्न केला. दोन्ही संघ हे दृश्य पाहत होते, यानंतर रागाच्या भरात मेस्सी आपल्या संपूर्ण टीमसह ड्रेसिंग रूममध्ये परतला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आली आणि अर्ध्या तासाच्या विलंबानंतर सामना सुरू होऊ शकला. सामन्यातही दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. अखेर अर्जेंटिनाने हा सामना 1-0 ने जिंकला.