ऑनलाइन लोकमत
भारतात क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचे जे स्थान आहे. तेच स्थान फुटबॉलच्या जगात लिओनेल मेस्सीचे आहे. भारतात क्रिकेट फक्त खेळ नसून एक धर्म आहे. अर्जेंटिनात फुटबॉलचीही तशीच स्थिती आहे. दोन्ही देशातील चाहत्यांना प्रतिस्पर्ध्यावर फक्त विजय हवा असतो. पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याची फार कमी जणांची तयारी असते.
क्रिकेटमधल्या अव्दितीय, अदभुत प्रतिभेमुळे नेहमीच सचिन तेंडुलकरकडून कोटयावधी भारतीयांच्या भरपूर अपेक्षा असायच्या. अनेकदा सचिन त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जायचा आणि मोक्याच्या क्षणी सर्वाधिक गरज असताना ढेपाळायचा. फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीने हा अनुभव अनेकदा घेतला. सोमवारी चिली विरुद्धच्या अंतिम सामन्यातही मेस्सीवर तोच दबाव होता.
ट्रॉफी शिवाय अर्जेंटिनात पाऊल टाकू नका असे मॅराडोनाने म्हटले होते. त्यावरुन दबावाची कल्पना येते. याच दडपणाखाली मेस्सी सारख्या अव्वल खेळाडू पेनल्टी किक चुकला आणि या सार्वकालिन महान फुटबॉलपटूने तडाकफडकी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर मेस्सीची चॅम्पियन नसल्याचे दु:ख सलते ही प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते.
२००५ मध्ये अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केल्यानंतर या खेळाडूने कधीच मागे वळून बघितले नाही. प्रतिस्पर्धी संघाची भक्कम बचावफळी भेदण्याच्या कौशल्यामुळे फक्त अर्जेंटिनातच नव्हे जगभरात मेस्सीचे कोटयावधी चाहते आहेत. पाचवेळा या महान फुटबॉलपटूने फिफाचा बॅलन डी ओर पुरस्कार मिळवला. त्यातही सलग चारवेळा त्याला हा पुरस्कार मिळाला. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे.
स्पेनमधील बार्सिलोना क्लबच्या या फॉरवर्ड खेळाडूने क्लब स्तरावर मोठे यश मिळवले. पैसा आणि प्रसिद्धी मेस्सीला भरभरुन मिळाली पण देशासाठी खेळताना तो कमनशिबी ठरला. आपल्या अदभुत प्रतिभेच्या जोरावर त्याने अर्जेंटिनाला दोन वर्षांपूर्वी फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले मात्र निर्णायक सामन्यात त्याला विश्वविजयी गोल साकरता आला नाही.
कोपा अमेरिका या दक्षिण अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला पण त्याला अंतिम निर्णायक सामन्यात चॅम्पियन कामगिरी करता आली नाही. आपल्याकडे सचिनच्या वाटयाला जे आले तीच मेस्सीची स्थिती होती. सचिनने शतक, धावांचा विक्रम रचला. प्रत्येक वर्ल्डकपमध्ये सचिन खो-याने धावा करायचा पण निर्णायक सामन्यात सचिन अपयशी ठरायचा.
त्यामुळे टीकाकारांनी सचिनला मॅचविनरचा दर्जा दिला नाही. दोन दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनच्या खात्यावर वर्ल्डकप विजयाची नोंद नसती तर, रचलेल्या विक्रमांमध्ये त्याला एक रितेपणा जाणवला असता. आज मेस्सीचीही तशीच स्थिती आहे. व्यक्तीगत पराक्रमी कामगिरीपेक्षा आपण देशवासियाच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही ही सल त्याला तीव्रतेने जाणवली त्यामुळे महान फुटबॉलपटूने वयाच्या २९ व्या वर्षी तडकाफडकी राजीनामा देऊन कोटयावधी चाहत्यांना चटका दिला.