राजकोट : तिन्ही सामन्यांत अपराजित राहिलेल्या गुजरात लायन्सला आज गुरुवारी आयपीएलच्या नवव्या सत्रात सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असून, विजयी लय कायम राखण्याचे लायन्सचे प्रयत्न असतील. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी रवींद्र जडेजा विवाहबद्ध होऊन लायन्स संघात परतला आहे. या संघाने मुंबई इंडियन्स, किंग्ज पंजाब आणि पुणे सुपरजायंट्सवर विजय साजरे केले. संघाच्या फलंदाजीची मुख्य भिस्त अॅरोन फिंच याच्यावर असेल. या सलामीवीराने तिन्ही सामन्यांत अर्धशतकी खेळी केली. तिन्ही सामन्यांत तो सामनावीर होता. आयपीएलच्या इतिहासात सलग तीनदा सामनावीराचा पुरस्कार एकाच खेळाडूला मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. ब्रँडन मॅक्यूलम आतापर्यंत चमकला नाही. तिन्ही सामन्यांत त्याची सर्वोच्च खेळी ४९ धावांची होती. कर्णधार सुरेश रैना हा चांगल्या सुरुवातीचा लाभ घेऊ शकला नाही. दिनेश कार्तिक, ड्वेन ब्राव्हो आणि जडेजा हे लायन्ससाठी मोठी खेळी करण्यात सक्षम आहेत. गोलंदाजीत ब्राव्हो, जेम्स फॉल्कनर आणि प्रवीण कुमार यांच्यावर जबाबदारी असेल. फिरकी माऱ्याची बाजू जडेजा, शादाब जकाती आणि प्रवीण तांबे सांभाळणार आहे. सनरायझर्सने तीनपैकी केवळ एकच सामना जिंकला. मागच्या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्या ५९ चेंडूंतील नाबाद ९० धावांच्या बळावर सनरायझर्सने मुंबई इंडियन्सला ७ गड्यांनी नमविले होते. युवराज आणि केन विलियम्सन यांच्या अनुपस्थितीत हैदराबादची फलंदाजी कमकुवत वाटते. दोघेही टी-२० विश्वचषकादरम्यान जखमी झाले. शिखर धवन ‘आऊट आॅफ फॉर्म’ आहे. अशावेळी मोझेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, इयोन मोर्गन यांच्यावर धावा काढण्याची मोठी जबाबदारी असेल. सीनियर वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्या उपस्थितीत भुवनेश्वर कुमार, बांगला देशचा मुस्तफिझूर रहमान हे नवीन चेंडू सांभाळणार आहेत. त्यांच्या सोबतीला हेन्रिक्स आणि विपुल शर्मा असतील. > सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वार्नर (कर्णधार), शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुड्डा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयोन मोर्गन, मुस्तफिझूर रहमान, आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तारे, केन विलियम्सन आणि युवराजसिंंग.गुजरात लायन्स सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, रवींद्र जडेजा, सरबजीत लढ्ढा, अक्षदीप नाथ, अमित मिश्रा, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, ब्रँडन मॅक्यूलम, पारस डोगरा, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, शादाब जकाती, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे आणि अॅन्ड्र्यू टाये.
लायन्स-सनरायझर्स आज लढत
By admin | Published: April 21, 2016 4:20 AM