दोहा : नीरज चोप्रा आणि हिमा दास हे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्याविना शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये उतरणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून पदकांची आशा कमीच आहे. या खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला, तरी देशासाठी ते मोठे यश ठरेल.भालाफेकपटू नीरज चोप्रा ढोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो सरावात व्यस्त आहे. हिमाने युरोपात जवळपास चार महिने सराव केला. यादरम्यान तिने काही शर्यती जिंकल्या. जागतिक स्पर्धेच्या संघात स्थान मिळविल्यानंतर तिच्या कंबरेची दुखापत उफाळल्यानेमाघार घेतली आहे. हिमाच्या दुखापतीच्या व्यवस्थापनावरून भारतीय अॅथलेटिक्स महासंघाला टीकेचा सामनाही करावा लागला.जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नीरज फिट असता, तर त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करता आली असती. हिमा गेल्या दोन महिन्यांपासून ४०० मीटरच्या आवडीच्या प्रकारात ५०.७९ सेकंद या सर्वोत्कृष्ट वेळेपर्यंत पोहोचू शकली नाही.भारतीयांमधून अंतिम फेरी कोण गाठेल, हे सांगणे कठीण आहे. अॅथलेटिक्स महासंघाला मात्र ४ बाय ४०० मीटर रिले व मिश्र ४ बाय ४०० मीटर रिले या संघांकडून पदकाची आशा आहे. मिश्र ४ बाय ४०० मीटर रिलेचा समावेश प्रथमच जागतिक स्पर्धेत झाला आहे. भारतीयांकडून पदकाची अपेक्षा बाळगणे अतिशयोक्ती ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. २००३ च्या विश्व स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज हिने एकमेव कांस्य पदक जिंकले होते. २०१७ ला लंडन येथे भालाफेकीत देविंदरसिंग कंग अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. (वृत्तसंस्था)अनस रिलेत धावणार भारताच्या २७ सदस्यांच्या संघात१३ खेळाडू केवळ रिले शर्यतीसाठी आहेत. धरुन अय्यास्वामी वैयक्तिक ४०० मीटर अडथळा शर्यतीत आव्हान सादर करेल. त्याचवेळी राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनस याला वैयक्तिक ४०० मीटरमध्ये उतरविण्यात येणार नाही. तो ४ बाय ४०० मीटर रिले संघातून अंतिम फेरीसाठी प्रयत्न करेल.
दोहा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा: भारतीय संघाकडून पदकाची आशा कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 1:35 AM