ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. १ - श्रीलंकेच्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या बारा षटकात तीन बाद ७७ धावा झाल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि सुरेश रैना तंबूत परतले आहेत.
११ धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. कुलसेकराने त्याला एका धावेवर चंडीमलकरवी झेलबाद केले. त्यानंतर रोहित शर्मा १५ धावांवर कुलसेकराचा बळी ठरला. सुरेश रैनाला शांकाने २५ धावांवर बाद केले. विराट आणि रैनाने तिस-या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली.
विराट नाबाद ३१ धावांवर खेळत असून, युवराज सिंग त्याला साथ द्यायला मैदानात आला आहे. प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने निर्धारीत २० षटकात नऊ बाद १३८ धावा केल्या असून, भारताला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य दिले आहे. कपुगेंदरा ३०, श्रीवर्धने २२ आणि अन्य फलंदाजांच्या छोटया खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला हे लक्ष्य दिले आहे.
श्रीलंकेकडून कपुगेंदरा आणि श्रीवर्धनमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक ४३ धावांची भागीदारी झाली. भारताकडून बुमराह, पांडया आणि अश्विनने प्रत्येकी दोन आणि नेहराने एक गडी बाद केला.
श्रीलंकेला सहा धावांवर पहिला तर, १५ धावांवर दुसरा धक्का बसला. सलामीवीर चंडीमल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. नेहराने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर जयसूर्याला तीन धावांवर बुमरहाने धोनीकरवी झेलबाद केले.
दिलशानला १८ धावांवर पांडयाने अश्विनकरवी झेलबाद केले. संघाच्या ५७ धावा असताना कर्णधार मॅथ्यूज १८ धावांवर बाद झाला. पांडयाने त्याच्या यष्टया वाकवल्या. श्रीवर्धनेला अश्विनने २२ धावांवर रायनाकरवी झेलबाद केले.
सलग दोन सामने जिंकणा-या भारताचा आज श्रीलंके विरुद्ध तिसरा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात अजिंक्य रहाणेऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत असला तरी, दुखापतग्रस्त खेळाडू भारताची चिंता आहे. मागच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवले होते. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुस-या बाजूला श्रीलंकेचा बांगलादेशने पराभव केला होता.