ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 17 - दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि गतविजेता सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये "करो या मरो"ची लढाई सुरू आहे. मात्र, हैदराबादच्या फलंदाजीनंतर बंगळुरूत जोरदार पावसाला सुरूवात झाली असून सामना सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.पावसामुळे हा सामना रद्द करावा लागल्यास कोलकाताला मोठा फटका बसू शकतो कारण गुणतालिकेनुसार हैदराबादला विजयी घोषित केलं जाईल. यापुर्वी टॉस हारल्याने प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबाद संघाने 20 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 128 धावा केल्या असून कोलकात्याला विजयासाठी 129 धावांचं माफक लक्ष्य दिलं आहे. कोलकात्याच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून हैदराबादच्या फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाही. कोलकात्याकडून कुल्टर-नाइलने सर्वाधिक 3 गडी तर उमेश यादवने 2 गडी बाद केले. त्यांना बोल्ट आणि चावला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेऊन चांगली साथ दिली.
हैदराबादची सुरूवात अडखळती राहिली. संघाच्या 25 धावा झाल्या असताना कोलकाताच्या उमेश यादवने शिखर धवनला 11 धावांवर बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर मैदानात आलेल्या केन विल्यम्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण संघाच्या 75 धावा झाल्या असताना नॅथन कुल्टर-नाइलने विल्यम्सनला 24 धावांवर बाद केलं. तर 75 धावसंख्येवरच पियुष चावलाने वॉर्नरला 37 धावांवर त्रिफळाचीत केलं. संघाच्या 99 धावा झाल्या असताना उमेश यादवने आणखी एक धक्का देताना युवराज सिंगला 9 धावांवर चावलाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर संघाच्या 118 धावा झाल्या असताना विजय शंकरला 22 धावांवर कुल्टर-नाइलने बाद केले तर लगेचच कुल्टर-नाइलने जॉर्डनला खातं न खोलता तंबूत धाडलं. तर नमन ओझा 16 धावांवर आणि बिपुल शर्मा 2 धावांवर नाबाद राहिला.
या लढतीतील विजेत्या संघाला मुंबई-पुणे संघांदरम्यानच्या पहिल्या क्वालीफायरमधील पराभूत संघासोबत १९ मे रोजी लढत द्यावी लागेल. या लढतीनंतर अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होईल.
केकेआर संघाने यंदाच्या मोसमातील दुसऱ्या टप्पात सातपैकी चार सामने गमावले आहेत. शाहरुख खानच्या मालकीचा संघ सुरुवातीला मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. मॅच विनर ख्रिस लिनला सूर गवसेल, अशी केकेआर संघाला आशा आहे.
लिनने गेल्या महिन्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २१ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली होती. त्याने कर्णधार गंभीरच्या साथीने गुजरात लायन्सविरुद्ध सलामी लढतीत १८४ धावांची भागीदारी करताना नाबाद ९३ धावा केल्या होत्या. केकेआर संघाला सुनील नरेनकडूनही चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. त्या लढतीत त्याने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकताना आयपीएलमधील सर्वांत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी साधली होती.
केकेआर संघात मनीष पांडे व रॉबिन उथप्पा या फलंदाजांचाही समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे ३९६ व ३८६ धावा फटकावल्या आहेत.
गंभीर सुरुवातीला शानदार फॉर्मात होता, पण त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याने आतापर्यंत यंदाच्या मोसमात ४५४ धावा फटकावल्या आहे. त्याला पुन्हा सूर गवसेल अशी केकेआर व्यवस्थापनाला आशा आहे.
गोलंदाजीमध्ये ख्रिस व्होक्स (१७ बळी) आणि उमेश यादव (१४ बळी) चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांच्यापुढे डेव्हिड वॉर्नर अँड कंपनीला रोखण्याचे कडवे आव्हान राहणार आहे.
गत चॅम्पियन सनरायजर्स संघाने १४ पैकी ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर पाच सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. (वृत्तसंस्था)