ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 -आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तान संघाचे सलामीवीर अझहर अली आणि फखर जमान यांनी चांगली सुरूवात केली. दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली मात्र 23 व्या षटकात अर्धशतकवीर अझहर अली याला धावचीत करण्यात भारताला यश आलं. त्याने 71 चेंडूत 59 धावा काढल्या. त्याच्याजागी बाबर आझम मैदानात आला असून त्याच्यासोबत 103 धावा काढून फखर जमान खेळत आहे. फखर जमानने नो-बॉलवर मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने शानदार शतक झळकावलं. 106 चेंडूत 114 धावा त्याने फटकावल्या. अखेर 34 व्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला रविंद्र जाडेजाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर शानदार गोलंदाजी करणा-या भुवनेश्वर कुमारने शोएब मलिकला झटपट बाद केलं. सध्या 42.3 षटकात पाकिस्तानच्या 4 गडी बाद 270 धावा झाल्या आहेत.
भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानचा सलामीवीर अझहर अली याला पहिलं षटक निर्धाव टाकत भारताला चांगली सुरूवात करून दिली होती. पण त्यानंतर मिळालेल्या संधीचा भारतीय संघाला लाभ उठवता आला नाही. चौथ्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला होता. बुमराहच्या या ओव्हरमध्ये फखर जमान हा धोनीकडे झेल देऊन बाद झाला होता. पण त्याला नशिबाची साथ मिळाली कारण बुमराहचा हा बॉल रिप्ले बघितल्यानंतर नो-बॉल देण्यात आला. सध्या 34 षटकात पाकिस्तानच्या दोन गडी बाद 200 धावा झाल्या आहेत.
या लढतीसाठी भारतीय संघाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तर पाकिस्तानने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. अंतिम सामन्यासाठीच्या खेळपट्टीचा विचार करायचा झाल्यास अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येत असलेली ओव्हलची खेळपट्टी ठणठणीत असून, त्यावर बऱ्यापैकी गवत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र खेळपट्टीवर गवत असल्याने गोलंदाजांना थोडीफार मदत मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे सामन्यादरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गतविजेता असलेल्या भारतीय संघाने जेतेपद राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर नशिबाची साथ आणि उत्तरोत्तर उंचावलेला खेळ याच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारणारा पाकिस्तानी संघ आज भारताला धक्का देण्यासाठी इच्छुक असेल. त्यांच्याकडे अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, कर्णधार सर्फराझ अहमद तर गोलंदाजीत मोहम्मह आमीर असा तगडा फौजफाटा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. पण विराटसेनाही सध्या उत्साहाने भारलेली आहे. आघाडीच्या फळीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या त्रिदेवांचा जबरदस्त फॉर्म, त्यांना मधल्या फळीत युवराज, धोनी आणि केदार जाधव यांच्याकडून मिळणारी सुरेख साथ, इंग्लंडच्या वातावरणात बहरलेली गोलंदाजी यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानी संघाच्या आव्हानाची फारशी फिकिर नसेल. त्यातच 2007 साली ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध खेळलेले महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि रोहित शर्मा असे खेळाडू भारतीय संघात आहेत, त्यांच्या अनुभवही कामी येईल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान-
सरफराज अहमद (कर्णधार), अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, जुनैद खान, इमाद वसीम, शादाब खान, फखर जमान.