ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 17 - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानेही चांगली सुरुवात केली आहे. दुस-या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 120 धावा झाल्या आहेत. भारत अजूनही 331 धावांनी पिछाडीवर आहे. लोकेश राहुल (67) आणि मुरली विजय नाबाद (42) या दोन्ही सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली.
दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा लोकेश राहुल (67) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने वाडेकडे झेल दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पूजाराने पडझड होऊ दिली नाही. तो (10) धावांवर नाबाद आहे.
तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी वर्चस्व ठेवलेला ऑस्ट्रेलिया संघ दुस-या दिवशी मात्र सातत्य ठेवू शकला नाही. दुस-या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलिया 4 विकेट्स 299 धावांवर खेळत होती. मात्र दुस-या दिवशी फक्त 152 धावा करत 451 धावांचा टप्पा संघाने पार केला. जाडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत दुस-या दिवशी चार विकेट घेतले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या करिअरमधील एक सर्वोत्तम खेळी केली. स्टीव्ह स्मिथ 178 धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून जाडेजा सर्वात प्रभावी गोलदांज ठरला असून त्याने पाच विकेट्स घेतल्या तर उमेश यादवने तीन विकेट्स घेतल्या. अश्विनच्या खात्यात फक्त एकच विकेट जमा झाली. कर्णधार स्टीव्हन स्मिथचे शतक व त्याने ग्लेन मॅक्सवेलसोबत केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध गुरुवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २९९ धावांची मजल मारली होती.
दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएसमुळे वाद निर्माण झाला होता; पण स्मिथने सर्व विसरून आज १९ वे कसोटी शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी शतकवीर स्मिथला अडीच वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा ग्लेन मॅक्सवेल अर्धशतक झळकावित साथ देत होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४७.४ षटकांत १५९ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच अर्धशतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांसाठी पहिला दिवस खडतर ठरला. त्यात आणखी एका वाईट वृत्ताची भर पडली. कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो एका सत्रापेक्षा अधिक वेळ मैदानाबाहेर होता. कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले.
पहिला दिवस ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने गाजवला. त्याने भारताविरुद्ध गेल्या सात सामन्यांतील आपले सहावे कसोटी शतक झळकावले. सुरुवातीला खेळपट्टी संथ होती. भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून विशेष साथ लाभली नाही. आश्विन (२३ षटकांत ७८ धावांच्या मोबदल्यात १ बळी) आणि जडेजा (३० षटकांत ८० धावांच्या मोबदल्यात १ बळी) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उमेशचा मारा सावधपणे खेळून काढल्यानंतर स्मिथने भारताच्या अन्य गोलंदाजांना सहजपणे तोंड दिले. मुरली विजयच्या गोलंदाजीवर लाँग आॅन बाऊंड्रीवर चौकार वसूल करीत स्मिथने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. दरम्यान, स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा पल्ला सर्वांत जलद गाठणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमनने ३६ व्या, तर सुनील गावस्कर यांनी ५२ व्या कसोटी सामन्यांत पाच हजार धावांचा पल्ला गाठण्याची कामगिरी केली होती.