नागपूर : अल्पावधीतच देशविदेशात लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथान’ने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. लोकमत मीडियाच्या वतीने आयोजित या महामॅरेथॉनला असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त झाला, ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
एम्स ही जगातील शंभराहून अधिक देशांमधील आघाडीच्या ४०० हून अधिक लांब पल्ल्याच्या शर्यतींचे आयोजक सदस्य असलेली संस्था आहे. एम्सने प्रमाणित केल्यानंतर लोकमत महामॅरेथॉनचे सहावे पर्व नव्या उत्साहाने आयोजित होईल, हे निश्चित. एम्सने प्रमाणित मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे धावपटू जगातील अनेक मोठ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरू शकतात. आपण योग्य आणि अचूक अंतर धावत आहोत, हा विश्वास धावपटूंना मिळतो. धावण्याचा उत्कृष्ट अनुभव घेण्यासाठी सर्व कौशल्य पणाला लावून संभाव्य अंतर आणि वेळेचे तंतोतंत पालन करण्याची धावपटूंना खात्री पटते.
लोकमत महामॅरेथॉनला एम्सचे प्रमाणीकरण २०२६ अखेरपर्यंत मिळालेले आहे. याचा लाभ धावपटूंना होईल. लोकमत महामॅरेथॉन धावणारे धावपटू बोस्टन, लंडन, न्यूयॉर्क आदी जगातील लोकप्रिय आंतरराष्ट्रीय मॅरेथानसाठी पात्र ठरू शकतील. एखाद्या मॅरेथॉनला धावपटूंमध्ये ओळख आणि लोकप्रियता मिळवायची झाल्यास एम्सद्वारा ती शर्यत प्रमाणित असणे आवश्यक झाले आहे.
‘लोकमत महामॅरेथॉनने एम्स प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल फार अभिमान आणि सन्मान वाटतो. येत्या आयोजनापासून याला सुरुवात होणार असून अनेक मोठ्या स्पर्धांसाठी महामॅरेथॉन पात्रता आयोजन ठरणार आहे. जगातील मोठ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महामॅरेथॉन उपयुक्त ठरेल. आगामी दोन वर्षांत आमचे आयोजनदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवेल, अशी आशा आहे. आमच्या ब्रॅन्डसाठी हे पहिले मोठे पाऊल ठरावे. धावपटूंना यंदाच्या सत्रात उत्कृष्ट अनुभव लाभेल, अशी मला खात्री वाटते.’ - रुचिरा दर्डा, संस्थापिका लोकमत महामॅरेथॉन