ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याची सध्याची आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. रनमशीन म्हणून ओळखल्या जाणा-या विराटच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. विराट नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे.
विराटला स्वत:च्या फलंदाजीतून सहका-यांसमोर आदर्श ठेवता आलेला नाही. पाच सामन्यांमध्ये फक्त एकदाच विराटला 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या. शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात 138 धावांचे छोटे लक्ष्य असतानाही बंगळुरुला 19 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विराट या सामन्यात फक्त 6 धावांवर बाद झाला.
विराटच्या या कामगिरीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही संताप व्यक्त केला आहे. कोहली सध्या ज्या पद्धतीने बाद होतोय त्यावर गावसकरांनी टीका केली आहे. विराटने आपलं तोंड आरशात पाहायला हवं. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोहली ज्या प्रकारे बाद झाला तो काही चांगला फटका नव्हता असे सामना संपल्यानंतर विश्लेषण करताना गावस्कर म्हणाले.
कोहली कर्णधार आहे त्यामुळे त्याने अधिक जबाबदारीने खेळ केला पहिजे असे गावसकर म्हणाले. विराट कर्णधार आहे त्यामुळे त्याने खेळपट्टीवर थांबले पाहिजे. तो फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळे त्याने खेळपट्टीवर थांबून चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जम बसल्यानंतर त्याने मोठे फटके खेळावेत असे गावसकर म्हणाले.