लॉर्डसवर 28 वर्षानंतर भारताची विजयी पताका फडकवण्यात सिंहाचा वाटा उचलणारा ईशांत शर्माने अपेक्षेचे एव्हरेस्ट पेलले असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, तो म्हणतो, मी बळी मिळवले म्हणून लोक माझा उदोउदो करीत आहेत. पण समजा याउलट घडले असते, मला बळी मिळाले नसते किंवा मी धावा दिल्या असत्या, तर मला जयजयकाराऐवजी शिव्याशाप मिळाल्या असत्या. पण, मी सातत्याने बाउन्सरचा मारा करीत होतो, तेही 80 हून जास्त षटके वापर झालेल्या चेंडूने. हे सोपे काम नाही. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना ईशांत सांगत होता. मी आता परिपक्व झालो आहे. कोणीही काहीही म्हंटले, तरी मला फारसा फरक पडत नाही. माङो सहकारी माङयावर विश्वास ठेवतात. मी काय करु शकतो, हे त्यांना माहीत आहे.
त्याच्या या प्रतिक्रियेने त्याच्या आयुष्यातील वेदना कळू शकते. भारतीय क्रिकेट संघातील स्थान हे त्याच्यासाठी मोरपिसांच्या गादीइतके सुखदायक नाही, हे सिद्ध होते. 2007 साली 19व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केलेल्या ईशांतचे करियर चढ-उताराने भरलेले आहे. पदार्पणात ईशांतकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या. 2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौ:यात त्याच्या एका कृतीने भारताला एका महान विजयाची नोंद करता आली. पर्थमधील कसोटी सामन्यात कर्णधार कुंबळेने त्याला ‘और एक ओव्हर करेगा’ असे विचारले, असता त्याने ‘हां मैं करुंगा असे उत्तर दिले. पर्थवरील उन्हात त्याने ते षटक टाकताना वेग आणि स्टॅमिना याच्याशी तडजोड न करता जीव तोडून गोलंदाजी केली. याचे फळ त्याला लगेच मिळाले, पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगची विकेट त्याने काढली. हा त्या सामन्यातील टर्निग पॉईंट होता. हा सामना भारताने जिंकून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
तथापि यशाच्या अधून मधून सरी बरसणारा इशांत शर्मा कायमस्वरुपी भरवशाचा कधी वाटत नव्हता. तो त्याच्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतो. चुका सुधारण्यासाठी सतत परिश्रम करतो, पण तो विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसारखा संघाचा हुकमी एक्का कधी बनला नाही.
त्याच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 57 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 37.4 च्या सरासरीने 174 बळी घेतले आहेत. डावात पाच बळी मिळवण्याची किमया त्याने 6 वेळा केली आहे. तर एकदा त्याने सामन्यात दहा बळी मिळविले आहेत. यावरुन त्याचा फॉर्म हा वळवाच्या पावसासारखा बेभरवशाचा असल्याचे दिसून येते. म्हणूनच संघातील त्याच्या स्थानावर टीकाकार प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. विदर्भाच्या उमेश यादवऐवजी ईशांतची निवड झाल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला होता. पण या सर्वांवर मात करणारी एक शक्ती त्याच्याकडे आहे, ती म्हणजे कर्णधार धोनीचा त्याच्यावर असलेला विश्वास. त्याच्यावर आम्ही खूप इनव्हेस्टमेंट केली असल्याचे धोनी सांगतो. इशांतची स्ट्रेंथ त्याच्या कर्णधाराला माहीत होती. लॉर्ड्स कसोटीत त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला.