नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.सेनादलाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना जितूने राष्ट्रकुल स्पर्धेत युवा खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीचा गौरव केला. या युवा खेळाडूंना फटका बसू नये यासाठी २०२२ च्या राष्ट्रकुलमध्ये नेमबाजी कायम ठेवावी, असे आवाहन केले. तो पुढे म्हणाला, ‘आम्ही केवळ नेम साधू शकतो आणि खेळ कायम ठेवण्याची विनंती करू शकतो. खेळ कायम ठेवणे सरकार आणि आयोजकांच्या हातात आहे. खेळ कायम राहील, अशी मला आशा आहे.’गोल्ड कोस्ट येथे चमकदार कामगिरी करणाºया सेनादलाच्या सर्व खेळाडूंचे आज सेनेतर्फे जंगी स्वागत झाले. २०२२ च्या राष्टÑकुलमध्ये नेमबाजीचा समावेश न झाल्यास भारताने राष्टÑकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन एनआरएआयने केले आहे. याविषयी विचारले असता जितू राय म्हणाला की, ‘एनआरएआयने असे आवाहन केले असेल तर ते खेळाडूंच्या हिताचेच आहे. भारत या खेळात दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. नेमबाज देशासाठी पदके आणत असताना अचानक खेळ वगळण्याच्या हालचाली होत असतील, तर या कृतीला विरोध व्हायला हवा. बहिष्कारासारखा कडवा विरोध झाल्यास काही फरक पडेल. मी एनआरएआयच्या भूमिकेस पाठिंबा देतो.’(वृत्तसंस्था)
‘... तर युवा नेमबाजांचे नुकसान!’ - जितू राय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:02 AM