ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २६ - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारल्याने भारताचा डाव अवघ्या २३३ धावांवरच आटोपला आहे. भारतावर ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये प्रवेश केला असून फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड हे संघ आमने सामने असतील.
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३२९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने बिनबाद ७६ धावांची सलामी दिली. मात्र हॅझलवूडच्या चेंडूवर फटकावण्याच्या नादात शिखर धवन ४५ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहली १, रोहित शर्मा ३८ आणि सुरेश रैना ७ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था २३ षटकांत ४ बाद १०८ धावा अशी झाली. अजिंक्य रहाणे व महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे ४४ धावांवर बाद झाला. धोनीने एकतर्फी झुंज देत ६५ धावा केल्या. मात्र त्याला अन्य एकाही फलंदाजाकडून अपेक्षीत साथ मिळाली नाही. रविंद्र जडेजा १६, आर. अश्विन ५ धावा तर मोहित शर्मा व उमेश यादव हे भोपळा न फोडताच माघारी परतले. भारताचा डाव ४६.५ षटकांत २३३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे फॉल्कनरने ३, मिशेल जॉन्सन व मिशेल स्टार्कने प्रत्येकी २ तर हॅझलवूडने एक विकेट घेतली.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथच्या १०५ व अॅरोन फिंचच्या ८१ धावांच्या खेळीने ५० षटकांत ३२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नर १२ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर स्टिव्ह स्मिथ व फिंचने भारतीय गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. उमेश यादव स्मिथचा अडसर दूर करत ही जोडी फोडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या २३२ धावा झाल्या असताना मॅक्सवेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ फिंचलाही यादवने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती ४० षटकांत ४ बाद २३३ अशी झाली. त्यानंतर कर्णधार मायकेल क्लार्क फलंदाजीला अाल्याने तो पुन्हा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरेल असेल वाटत असतानाच मोहित शर्माने त्याला १० धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ फॉकनर (२१) आणि वॉटसनही (२८) बाद झाले. अखेरच्या षटकांमध्ये मिशेल जॉन्सनने ९ चेंडूत २७ धावा चोपून ऑस्ट्रेलियाला ३२८ धावांपर्यंत नेले. भारतातर्फे उमेश यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शतकवीर स्टिव्ह स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.