Nick Kyrgios Australian Open Video: ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक कार्गिओसने वर्षातील पहिलं ग्रँड स्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. निकने ऑस्ट्रेलिाचा सहकारी थानासी कोकिनाकिस याच्यासह जर्मनीच्या टिम पोएट्झ आणि न्यूझीलंडच्या मायकल व्हीनसचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. निक-थानासी जोडी ही प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचली. पण या सामन्यादरम्यान कर्गिओसने केलेल्या एका कृतीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या या सामन्या दरम्यान कार्गिओसने चुकून सामना पाहायला बसलेल्या एका मुलाला चेंडू मारला. चेंडू जोरदार वेगाने लागल्याने मुलाने जागीच रडायला सुरूवात केली. मुलाला चेंडू लागल्याचे समजताच कार्गिओस खूपच निराश झाला. त्यानंतर त्याने थेट आपली एक टेनिस रॅकेट या मुलाला भेट दिली.
नक्की काय घडलं?
जेव्हा कार्गिओस आणि त्याचा साथीदार पहिल्या सेटमध्ये १-२ असा बरोबरीत खेळत होता, तेव्हा कार्गिओसच्या साथीदाराने सर्व्हिस केली, पण चेअर अंपायरने ती सर्व्हिस बाद ठरवली आणि चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या रॅकेटवर आदळला. त्याने चेंडू कार्गिओसकडे मारला आणि कार्गिओसने टोलवलेला चेंडू जोरदार मारला. नेमका तोच चेंडू जोरात लहान मुलाला लागला आणि त्या मुलाने रडायला सुरूवात केली.
कार्गिओसने हात दाखवून त्या मुलाची माफी मागितली आणि त्याला या गोष्टीचे खूप दुःख झालं. कर्गिओसने चेंडू मुलांकडे मारताच चेअर अंपायरही मुलाला पाहण्यासाठी उठले. त्यानंतर कार्गिओसने ताबडतोब त्याच्या बॅगमधून एक टेनिस रॅकेट काढली आणि त्याला ती रॅकेट भेट देत त्याला 'सॉरी' म्हटलं.