Lovlina Borgohain Boxing, India in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ७५ किलो वजनी गटात बॉक्सिंग प्रकारात भारताच्या लोव्हलिना बोर्गोहेनचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली कियान हिच्याशी तिचा सामना झाला. हा सामना उपांत्यपूर्व फेरीचा होता. लोव्हलिना बोरगोहेनचा ली कियान हिने १-४ असा एकतर्फी पराभव केला. लोव्हलिनाच्या पराभवासोबतच भारताचे पुरुष आणि महिला बॉक्सिंगमधील आव्हान संपुष्टात आले.
ऑलिम्पिक २०२४ मधील प्रवास
पॅरिसमध्ये ३१ जुलैला झालेल्या सलामीच्या फेरीत लोव्हलिनाचा सामना नॉर्वेच्या सुन्नीवा हॉफस्टॅड हिच्याशी झाला होता. त्या सामन्यात लोव्हलिनाने ५-० असा विजय मिळवला होता. संपूर्ण सामन्यात तिने प्रतिस्पर्ध्याला डोकं वर काढण्याची संधीच दिली नव्हती. पण आज उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लोव्हलिनाला दबदबा राखता आला नाही. त्यामुळेच तिला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक!
गेल्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने मिळवलेल्या ७ पदकांपैकी एक पदक लोव्हलिनाचे होते. तिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ६९ वजनी गटामध्ये कांस्यपदक पटकावले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी आसाम या राज्याची ती पहिली महिला खेळाडू आणि दुसरी बॉक्सर होती. तिने प्राथमिक फेरीत जर्मन बॉक्सर नादिन अपेट्झचा पराभव केला होता. त्यानंतर तैवानच्या चेन निएन-चिनचा पराभव केला होता. त्यावेळीच तिचे पदक निश्चित झाले होते. अखेर कांस्यपदकाच्या सामन्यात लोव्हलिनाने उझबेकिस्तानच्या मेलिएव्हाचा पराभव करून तिने भारतासाठी पदक मिळवले होते.