ऑलिम्पिक ही खेळांची सर्वोच्च स्पर्धा. या स्पर्धेसाठी नुसती निवड होणंदेखील खूप मानाची गोष्ट. जे या स्पर्धेत पदक पटकावतात ते तर जगातले सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवले जातात. ऑलिम्पिकच्या पात्रतेचे निकषही अतिशय कठोर असतात. त्यामुळेच उत्तमातल्या सर्वोत्तमांची ही स्पर्धा पाहण्यासाठी अख्खं जग आसुसलेलं असतं. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक घटना गाजल्या. काही वाद झाले, काही किस्से घडलेत, तर इतरही काही अनोख्या गोष्टी हळूहळू उजेडात येताहेत.
अशाच एका घटनेनं संपूर्ण जगानं आश्चर्यानं तोंडात बोटं घातली आहेत. कोणती आहे ही घटना? आपल्या देशात जलतरणात अतिशय उत्तम कामगिरी केलेल्या एका महिला जलतरणपटूची ही कथा. त्यांच्या देशातर्फे ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली. पॅरिसच्या ऑलिम्पिकनगरीत ती दाखल झाली. आपल्या देशाच्या संघाबरोबर राहिली, पण गैरवर्तना 'मुळे तिला ऑलिम्पिकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अर्थात तिच्यावर ही कारवाई आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं केली नाही, तर तिच्याच देशानं 'बेशिस्ती'च्या आरोपाखाली तिला ऑलिम्पिक नगरीतून बाहेर पाठवला हा देश आहे पॅराग्वे आणि त्या महिला जलतरणपटूचं नाव आहे लुआना अलॉसो.
का तिला ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यात आलं? कारण तिच्यामुळे इतर खेळाडूंची कामगिरी सुमार होत होती म्हणून! आता कोणीही म्हणेल, एखाद्या खेळाडूमुळे दुसऱ्या खेळाडूंची कामगिरी कशी काय बिघडेल? तेही त्या खेळांशी, त्या खेळाडूंशी या महिलेचा काहीही संबंध नसताना! लुआना अलॉसो पैराग्वेची केवळ उत्तम जलतरणपटूच नाही, तर ती अतिशय देखणी, सुंदरही आहे. पॅराग्वेचे इतर खेळाडू ज्या ठिकाणी राहात होते त्या परिसरातच तीही राहात असल्यानं आणि तिचा तिथे वावर असल्यामुळे इतर खेळाडूंचं लक्ष विचलित होत होतं. विशेषतः पुरुष खेळाडू तिच्या सौंदर्यावर भाळून इतर खेळाडूंचं आपल्या खेळावरील लक्ष भरकटत होतं.. तिच्या 'असण्यामुळे' खेळाडूंचं लक्ष आपल्या खेळाऐवजी तिच्याकडेच जास्त जात असल्यामुळे खेळाडूंची कामगिरी खालावत असल्याचा निष्कर्ष पॅराग्वेच्या अधिकाऱ्यांनी काढला.
इतकंच काय, आपल्या पराभवाचं, खराब कामगिरीचं खापर काही खेळाडूंनीही तिच्यावरच फोडली ती जर आणखी काही काळ ऑलिम्पिक नगरीमध्ये राहिली तर उरलेल्या स्पर्धांत आणि त्यात भाग घेतलेल्या खेळाडूंच्या कामगिरीतही घसरण होईल या भीतीनं अर्ध्या ऑलिम्पिकमधूनच तिला घरी पाठवण्यात आलं. अर्थात तोपर्यंत लुआनाचं जलतरणातील आव्हान संपलेलं होतं. जलतरणाच्या ज्या ज्या प्रकारांत तिनं भाग घेतला होता, त्यातल्या कोणत्याच प्रकारासाठी ती फायनलसाठी क्वॉलिफाय करू शकली नाही. असं असलं तरी ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला असतो, त्यांना ऑलिम्पिक स्पर्धांचा अधिकृत समारोप होईपर्यंत ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्याची परवानगी असते. त्यानुसार लुआनाही स्पर्धा संपेपर्यंत तिथे राहू शकत होती, तिच्या देशानंही तिला तशी परवानगी दिलेली होती आणि इतर खेळाडूंबरोबरच ती मायदेशी परतणार होती, पण त्याआधीच तिला तातडीनं ऑलिम्पिक व्हिलेज सोडण्याचा 'आदेश' देण्यात आला.
यासंदर्भात पैराग्वेच्या राष्ट्रीय संघाच्या व्यवस्थापकानंही मान्य केलं की हो, आम्ही लुआनाला अर्ध्या ऑलिम्पिकमधूनच घरी पाठवलं, कारण तिची उपस्थिती आमच्या देशाच्या इतर खेळाडूंना प्रेरणा मिळण्यापेक्षा त्यांची कामगिरी खालावण्याला, त्यांचं लक्ष विचलित करण्यालाच अधिक कारणीभूत ठरत होती. लुआना अतिशय 'हॉट' असल्यामुळेच आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, अशी तक्रारही काही खेळाडूंनी केली होती. लुआनाला आपल्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक नगरी सोडावी लागली, तिचं सौंदर्य हा तिचा विक पॉइंट ठरला, तिच्या देशाच्या खेळाडूंची कामगिरी 'खालावली' असं सांगितलं गेलं तरी आपल्या लावण्यामुळे फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मात्र चाहत्यांची मनं तिनं जिंकली. त्यांच्या हृदयावर तिनं एकतर्फी राज्य केलं!
संतापानं घेतला जलतरण संन्यास ! आपल्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक नगरीतून आपल्याच देशानं आपल्याला बाहेर काढलं, 'घरी पाठवलं, याचा लुआनालाही मोठा धक्का बसला, मायदेशी परतल्यावर तिनं तडकाफडकी आपण जलतरण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. तिच्या या निर्णयानं तिच्या चाहत्यांना आणि इतर खेळाडूंनाही धक्का बसला. त्याबद्दल आपल्याच देशाला त्यांनी खडे बोलही सुनावले. लुआना आता पुढे काय करणार याबद्दल अनेकांना उत्सुकता असली तरी ती आता प्रशिक्षक म्हणून 'पाण्यात' उतरेल, असा अंदाज आहे.