Tokyo Olympics मध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परततील; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:50 PM2021-06-23T13:50:53+5:302021-06-23T13:52:58+5:30
Ajit Pawar Tokyo Olympics : महाराष्ट्रातून आलिंपिक पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी गाव-खेड्यात, वाडी-वस्तीवर क्रीडासंस्कृती रुजवण्याची गरज, पवार यांचं वक्तव्य.
ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती रुजवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. टोक्यो ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्रातील खेळाडू देशासाठी पदक जिंकून परत येतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी भारतीय ऑलिंपिक संघाला यशासाठी शुभेच्छा दिल्या.
जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनतर्फे डेक्कन जिमखाना-पुणे येथे ‘ऑलिंपिक डे २०२१’ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार हे कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. टोक्यो ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या राही सरनोबत (नेमबाजी), तेजस्विनी सावंत (नेमबाजी), प्रविण जाधव (तिरंदाजी), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग), सुयश जाधव (पॅरा जलतरण) यांच्यासह माजी ऑलिंपिक खेळाडूंचाही यावेळी ऑनलाईन सत्कार करण्यात आला.
"जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्राच्या सुपुत्राने मिळवून दिले होते. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. राज्य सरकार पूर्ण ताकदीने खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोक्यो ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील", असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनापासून काळजी घ्यावी
"टोक्यो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीने जात असताना, खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमने कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असले तरी अनेक देशातून तिथे खेळाडू येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी, सपोर्ट टीम सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. टोक्यो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावे, या देशवासीयांच्या भावनेचा आदर करा," असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
जागतिक ऑलिंपिक संघटना असो की महाराष्ट्र आलिंपिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडासंघटना व क्रीडा कार्यकर्ते करत असतात. राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांच्या क्रीडासेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील खेळाडू, क्रीडाकार्यकर्ते, क्रीडारसिकांना शुभेच्छा दिल्या.