नवी दिल्ली : खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण ४७ पदकांसह पदक तालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. तर ५२ पदकांसह हरियाणा संघ अव्वल स्थानावर आहे. व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्र संघाने अंतिम फेरी गाठली आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या खेळाडूंनी २० सुवर्णपदकांसह अव्वल स्थान राखले. तर महाराष्ट्र आणि दिल्लीने प्रत्येकी १६ सुवर्णपदके पटकावली. हरियाणाने १६ रौप्यपदकांची कमाई केली आहे. तर दिल्लीने १८ आणि महाराष्ट्राने १३ रौप्य कमावले. दिल्लीने २४, महाराष्ट्राने १३ आणि हरियाणाने १६ कांस्यपदकांची कमाई केली आहे.खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संंघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला २५-२०,२५-११,२५-२२ असे पराभूत केले. अंतिम फेरीत महाराष्ट्राचा सामना पश्चिम बंगालसोबत होईल. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये महाराष्ट्रच्या संघाला फारसा घाम गाळावा लागला नाही. त्यांनी पहिला गेम सहज जिंकला. त्यानंतर दुसरा गेम एकतर्फी झाला. तिसरा गेम जिंकत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.>विठ्ठल शेळकेला रौप्यखेलो इंडिया शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या विठ्ठल शेळके याने ७९ किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली. दिल्लीच्या अंकित वत्स याने त्याला अंतिम लढतीत पराभूत केले. त्यासोबतच दोन मुलांनी, तर तीन मुलींनी कांस्यपदकाची कमाई केली. फ्री स्टाईलमध्ये मुलांच्या गटात संजीव कुमार (६९ किलो) प्रशांत सूर्यवंशी (१०० किलो), मुलींमध्ये सृष्टी भोसले (६० किलो), विश्रांती पाटील, हर्षदा जाधव (६५ किलो) यांनी कांस्यपदक कमावले.
महाराष्ट्राला ४७ पदके, व्हॉलिबॉल उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशवर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:17 AM