पुद्दुचेरी : श्रुती भोसले (२०) व आभा लाड (१७) यांच्या उत्कृष्ट खेळामुळे महाराष्ट्र संघाने ४२व्या सबज्युनिअर राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत ‘ब’ गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत छत्तीसगड संघाचा ७१-७० गुणांनी पराभव केला. हा सामना अतिरिक्त वेळेत गेला. या वेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ९, तर छत्तीसगड संघाने ८ गुणांची नोंद केली. महाराष्ट्र मुलांच्या संघाला मात्र ओडीसाकडून पराभव पत्कारावा लागला. अखिल भारतीय बास्केटबॉल महासंघ अंतर्गत राजीव गांधी इनडोर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध छत्तीसगडच्या एलिझाबेथ एक्काने २१, तर नेहा कारवाने १३ गुण करून आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाला ओडीसाकडून ५६-६० गुणांनी पराभव पत्कारावा लागला. महाराष्ट्राकडून रेझाने ९, सईदने ९ व सय्यद जे आणि संकल्पने प्रत्येकी ८ गुण केले. ओडिसाकडून ब्रह्मानंदा व सरोजने प्रत्येकी १५, तर सौरवने १३ गुण केले. हा सामनासुद्धा अतिरिक्त वेळेत गेला. यावेळी ओडिसा संघाने १५, तर महाराष्ट्र संघाच्या मुलांनी ११ गुण केले. (वृत्तसंस्था)
महाराष्ट्रकडून छत्तीसगड पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 3:42 AM