मुंबई: इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले. सांगली जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील संकेत सरगरने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. संकेतवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच आता महाराष्ट्र सरकारने त्याला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून संकेत सरगरला ३० लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच संकेतचे प्रशिक्षक यांना देखील ७.५० लाख रूपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.
मराठमोळ्या संकेतचा डंका शनिवारी मराठमोळ्या संकेत महादेव सरगरने रौप्य पदक जिंकून भारताला पहिले राष्ट्रकुल पदक मिळवून दिले. संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. संकेतने मिळवलेल्या या पदकापूर्वी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये १२५ पदकांची कमाई केली होती आणि नेमबाजीनंतर ही सर्वोत्तम संख्या ठरली आहे. शेवटच्या प्रयत्नापर्यंत संकेत आघाडीवर होता मात्र त्याच्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीमुळे त्याला १३९ वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक पटकावले आणि संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले.
सांगलीच्या सुपुत्राने रचला इतिहासमराठमोळा २१ वर्षीय संकेत २०२० मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा चॅम्पियन राहिला आहे. त्याच्या नावावर ५५ किलो वर्गात (स्नॅच १०८ किलो, क्लीन अँड जर्क (१३९ किलो) राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. संकेत सरगरची ऑक्टोबर महिन्यात NIS पटियाला येथे प्रशिक्षण घेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. संकेतला वेटलिफ्टिंगची मजबूत वारसा लाभलेला आहे, २१ वर्षीय संकेत हा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इतिहासाचा विद्यार्थी आहे. तो खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० चा चॅम्पियन होता. विशेष म्हणजे या आठवड्यात तो जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देखील पदार्पण करणार आहे.
संघर्षमय कहाणीसंकेतचे वडील महादेव सरगर हे १९९० च्या कालावधीत सुरुवातीला ग्रामीण भागातून सांगलीत आले होते. त्यांनी उदरनिर्वाहासाठी प्रथम पान शॉप, संकेत पान आणि नंतर त्याच्या शेजारी चहा आणि नाश्त्याचा स्टॉल उघडण्यासाठी एका गाडीतून फळे देखील विकण्याचा छोटा व्यवसाय केला. संकेत म्हणतो की, त्याने खेळ सुरू केल्यानंतर काही वर्षांनी त्याने या खेळाला अधिक गांभीर्याने घेण्यास सुरूवात केली. "सुरूवातीच्या पहिल्या दोन वर्षी मला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची देखील माहिती नव्हते त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा मी विचारही करत नव्हतो. मला जिल्हा पातळीवरील स्पर्धांची तयारी कशी करावी हे आव्हान सतावत होते. मी त्याच्यासाठी खास प्रशिक्षम न घेता माझे प्रयत्न चालू ठेवले. मी इयत्ता ९ वीत जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता आणि तेव्हा कोणतेही प्रशिक्षण न घेता मी आज रौप्य जिंकले आहे", असे संकेतने विजयानंतर सांगितले.