- अमोल मचाले पुणे : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये यजमान महाराष्ट्र संघाने मुष्टियुद्ध प्रकारात हरियाणाखालोखाल दमदार कामगिरी करीत १२ सुवर्ण, ४ रौप्य आणि १६ कांस्य अशी एकूण ३२ पदकांची कमाई केली. शनिवारी आपल्या मुष्टियोद्धयांनी ४ सुवर्ण, १ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण १४ पदके जिंकली.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. मुष्टियुद्धात निखिल दुबे, बरुणसिंग, भावेशकुमार व हरिवंश तिवारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून सुवर्ण जिंकले.शनिवारी टेबल टेनिसमध्ये २ सुवर्ण आणि १ रौप्य तसेच टेनिसमध्ये १ सुवर्ण आणि १ रौप्य जिंकून महाराष्ट्राच्या पदकतालिकेत भर घातली. आज ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण १७ पदके जिंकत यजमान संघाने पडकतालिकेतील आपले अव्वल स्थान आणखी बळकट केले. ८३ सुवर्णांसह २१८ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ५५ सुवर्णांसह १६३ पदके जिंकणारा हरियाणा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तिसºया स्थानावरील दिल्लीने ४७ सुवर्णांसह १३१ पदके मिळवली आहेत.मुष्टियुद्धात बरुणसिंग याने २१ वर्षांखालील मुलांच्या ४९ किलो गटात आपलाच सहकारी अजय पेंडोर याच्यावर शानदार विजय मिळविला. बरुणसिंग याने याआधी जागतिक युवा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याच वयोगटातील ५२ किलो गटात भावेशने कर्नाटकच्या अन्वर याला पराभूत करीत सनसनाटी कामगिरी केली. हरिवंश तिवारी याने ६० किलो गटात हरयाणाच्या अंकित याला पराभवाचा धक्का देत अजिंक्यपद पटकावले.हरिवंश याने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळेच त्याला ४-१ असा विजय मिळविता आला.
> टेबल टेनिसमध्ये २ सुवर्ण, १ रौप्यमहाराष्ट्राच्या खेळाडूंनी शनिवारी टेबल टेनिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना २ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले. चिन्मय सोमया याने काल १७ वषार्खालील एकेरीत सुवर्ण मिळविले होते. आज देव श्रॉफच्या साथीत दुहेरीत बाजी मारत त्याने डबल धमाका केला. चिन्मय-देव जोडीने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मैनिक रॉय व सौम्यदीप सरकार यांचा ११-८, ११-७, ११-४ असा सहज पराभव केला.दिया चितळे-स्वस्तिका घोष ही जोडी १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अजिंक्य ठरली. त्यांनी रिशा गोगोई व गार्गी गोस्वामी यांचा ११-४, ११-६, ११-० ने धुव्वा उडविला. असा पराभव केला.मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मात्र महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे आणि रिगान अलबुकर्क या जोडीचे सुवर्ण हुकले. गुजरातच्या मानुष शाह-ईशान हिंगोरानी यांनी त्यांच्यावर ९-११, १०-१२, ११-६, ११-५, ११-७ने मात केली.टेनिसमध्ये सांघिक विजेतेपदटेनिसमध्ये महाराष्ट्राच्या संघाने सर्वोच्च कामगिरी करीत १७ तसेच २१ वर्षांखालील गटात सांघिक विजेतेपद पटकावले. टेनिसमध्ये यजमान संघाने एकूण ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ८ पदके जिंकली. यापैकी २ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी ५ पदके १७ वर्षांखालील वयोगटातील आहेत. १७ वर्षांखालील गटात गुजरातने दुसरे आणि हरियाणाने तिसरे तर २१ वर्षांखालील गटात तमिळनाडूने दुसरे आणि गुजरातने तिसरे स्थान प्राप्त केले.>समारोप सोहळा आजखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा रविवारी (दि.२०) म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत दुपारी १२ वाजता होणार आहे. यश मिळविलेल्या संघ आणि खेळाडूंना सर्वसाधारण विजेतेपद व इतर पारितोषिके समारोप सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळीक्रीडामंत्री विनोद तावडे, पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांसह राज्यातील मंत्री, आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.>प्रेरणा विचारेला सुवर्णटेनिसमध्ये महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारेने मुलींच्या १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक पटकावले. २१ वर्षांखालील मुलांच्या गटात मात्र ध्रुव सुनिशला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चुरशीच्या अंतिम फेरीत प्रेरणाने गुजरातच्या प्रियांशी भंडारीचा प्रतिकार ६-२, ५-७, ७-५ असा मोडून काढला. प्रेरणा ही मुंबई येथील पॅक टेनिस अकादमीत सराव करते.