जालंधर, नोव्हेंबर 29 : सिनियर कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेत सुमित आणि सत्यव्रत कडीयान यांनी सुवर्णपदक मिळवत दक्षिण आशियाई गेम्ससाठी आपली जागा निश्चित केली आहे.जालंधर येथे तब्बल 14 वर्षांनंतर स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सुमितने महाराष्ट्रच्या अभिजितवर 5-0 असा विजय मिळवत चमक दाखवली. रेल्वेच्या या खेळाडूला 125 किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
कडीयानने उत्तरप्रदेशच्या कपिल चौधरीवर 97 किलो वजनीगटात 9-0 असा एकतर्फी विजय नोंदवला.74 किलो वजनी गटात रेल्वेच्या प्रविण राणासमोर युवा कुस्तीगीर उत्तरप्रदेशच्या गौरव बलियानचे आव्हान होते. पण, अनुभवी राणाला अंतिम सामन्यात 3-5 असे पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
आपला फॉर्म कायम ठेवत 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रविंदरने सर्व्हिसेसाठी एसएससीबीच्या सोनाबा तानाजीला 12-2 असे 61 किलो वजनी गटात नमविले. या विजयमूळे रविंदरचे दक्षिण आशियाई गेम्समधील स्थान निश्चित झाले आहे. 70 किलो वजनीगटातील उपांत्यफेरीचा सामना लक्षवेधी राहिला. झारखंडच्या नवीनने नाकाला दुखापत होऊन देखील सर्व्हिसेसच्या नवीनवर विजय मिळवला.यानंतर अंतिम सामन्यात त्याने हरयाणाच्या विशालला नमविले.स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आघाडीच्या महिला रेसलर सहभागी होणार आहेत. भारताच्या विणेश फोगाट (55 किलो), रिओ कांस्यपदक विजेती साक्षी मलिक (62 किलो), दिव्या काकरान (68 किलो), सीमा बिसला (50 किलो), सरिता मोरे (57 किलो) आणि नवजोत कौर (65 किलो) यांचा सहभाग असेल. सात गटातील सुवर्णपदक विजेते रेसलर (पुरुष फ्रीस्टाईल 57 किलो, 61 किलो, 65 किलो, 74 किलो, 86 किलो, 97 किलो, 125 किलो, महिला -50 किलो, 53 किलो, 57 किलो, 59 किलो, 62 किलो, 68 किलो, 76 किलो) या सर्वांनी 6 ते 9 डिसेंबर मध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई गेम्ससाठी पात्रता मिळवली आहे.