- जयंत कुलकर्णीजालना : हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अंतिम लढतीत बुलडाण्याच्या बालारफिक शेख याने पुण्याच्या अभिजीत कटके याच्यावर ११-३ अशा मोठ्या गुणफरकाने मात करताना, रविवारी प्रथमच प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. बुलडाण्याचा बालारफिक शेख याचे महाराष्ट्र केसरीचे पहिलेच विजेतेपद आहे, तर दुसरीकडे अभिजीत कटके याचे सलग दुसºयांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याचे स्वप्न भंगले.महाराष्ट्र केसरी किताबाची लढत असल्यामुळे, रविवारी दुपारी ३ वाजल्यापासूनच कुस्ती चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रत्येक जण अभिजीत कटके व बालारफिक शेख यांच्यातील प्रतिष्ठेची लढत पाहण्यासाठी आसुसलेला होता. ‘बजरंग बली’, ‘भारत माता की जय’ या घोषणेतच या दोन तुल्यबळांतील अंतिम लढतीची घोषणा झाली.भूगाव येथील महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेल्या अभिजीत कटकेने सुरुवातीलाच बालारफिकला एकेरी पट काढताना सर्व ताकदीनिशी आखाड्याच्या बाहेर फेकले. या वेळी तेथील आखाडाप्रमुखाच्या अंगावर बालारफिक आदळला. यातून सावरताना बालारफिकने जबरदस्त आक्रमक पावित्रा अवलंबला व दुहेरी पट काढून २-१ अशी आघाडी घेतली. अभिजीतने पुन्हा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बालारफिकने त्याला बाहेर करीत, पहिल्या फेरीअखेर आपली आघाडी ३-१ अशी केली. पहिल्या फेरीनंतर बालारफिक जास्त आक्रमक झाला व सुरुवातीलाच दुहेरी पट काढताना आघाडी २ गुण घेतले, परंतु त्याच वेळी भारंदाज डाव मारत २ गुण वसूल केली. त्यानंतर, पुन्हा दुहेरी पट काढताना ११-३ अशी आघाडी घेत महाराष्ट्र केसरी किताबावर शिक्कामोर्तब केले.९२ किलोगटात अनिलची बाजीअंतिम सामन्यानंतर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, संयोजन समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आॅलिम्पियन मारुती आडकर, दयानंद भक्त आदींच्या उपस्थितीत बालारफिकला प्रतिष्ठित चांदीची गदा प्रदान केली.त्याआधी माती गटाच्या ९२ किलो वजन गटात नांदेडच्या अनिल जाधवने अंतिम सामन्यात मुंबईच्या सुहास गोडगे याला १-० तांत्रिक गुणांच्या आधारावर पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले. ९२ किलोच्या गादी विभागातील अंतिम सामन्यात सोलापूरच्या सिकंदर शेख याने भारंदाज व डंकी डावावर पुणे शहरच्या अक्षय भोसले याच्यावर मात करीत सुवर्णपदक पटकावले. ६५ किलो गादी गटात कोल्हापूरच्या सोनबा गोंगाणे याने आपल्याच गावच्या माणिक कारंडे याला ५-२ असे नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ६५ किलोच्या माती विभागात पुण्याच्या सूरज कोकाटे याने सोलापूरच्या सूर्यकांत रुपनवर याच्यावर ४-० अशी मात करीत सुवर्णपदकावर कब्जा केला.महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर झालेला आनंद बालारफिक शेख रोखू शकला नाही. अभिजीत कटके याच्यावर मात करतानाच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळे. एवढे मोठे यश मिळेल असे वाटले नव्हते. हे यश आपल्या गुरुला आपण समर्पित करीत आहोत. आपल्यावर प्रेम करणाºया सर्व कुस्ती प्रेंमीचे आभार, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.आक्रमक खेळ केलेल्या अभिजीत काटके याने अपेक्षित सुरुवात करताना लढतीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. लढतीतील पहिला गुण घेताना तो आपले जेतेपद पटकावणार असेच दिसत होते. मात्र, बालारफिकने सुरुवातीला सावध पवित्रा घेतल्यानंतर हळूहळू आपले सर्व डाव साधत अभिजीतवर नियंत्रण राखले. त्याच्या भक्कम पकडीपुढे अभिजीतही काहीसा थकलेला दिसला आणि अखेर त्याला हार मान्य करावी लागली.‘एवढे मोठे यश मिळेल असे वाटले नव्हते. महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद मी माझे गुरु गणपतराव आंदळकर यांना समर्पित करीत आहे. त्यांनी मला महाराष्ट्र केसरीचे स्वप्न दाखवले. आता माझे लक्ष्य हे हिंदकेसरी व्हायचे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवायचे हे आहे. माझ्यावर प्रेम करणाºया सर्व कुस्तीप्रेमींचे आभार,’ अशी प्रतिक्रिया त्याने प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा बालारफिक शेख याने जेतेपद पटकावल्यानंतर व्यक्त केली.९२ किलो गादी विभाग :सुवर्ण : सिकंदर शेख (सोलापूर), रौप्य : अक्षय भोसले (पुणे शहर), कास्य पदक : रोहित कारले (पुणे जिल्हा), अनिकेत मोरे (सांगली).९२ किलो माती विभागसुवर्ण : अनिल जाधव (नांदेड). रौप्य : सुहास गोडगे (मुंबई). कास्य : ज्ञानेश्वर गादे (हिंगोली).
महाराष्ट्र केसरी : मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला केले चीतपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 7:25 PM