सचिन भोसलेकोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रत्येक कुस्तीगीरांचे स्वप्न म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे पाहिले जाते. यंदा २०२२ सालाकरिता संयोजन करण्याचा मान पुण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे. ही स्पर्धा डिसेंबर अखेर होणार असून याबाबतचे पत्र राज्य कुस्तीगीर परिषद प्रस्ताव समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांनी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपुर्द केले आहे.
कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून १९६१ साली यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. त्या अंतर्गत गेली सहा दशकांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाते. कुस्ती टिकावी म्हणून इथल्या मातीतून चांगले मल्ल मिळावेत. ही स्पर्धा माती व गादी गटातून होते. दोन्हीतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदेसाठी अंतिम लढत होते. त्यात संयोजनाचा मान कोणाकडे जातो हाही प्रतिष्ठेचा विषय असतो. यासाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर माेहोळ व मोहोळ कुटुंबीयांचेकडे स्पर्धेची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्याला १०व्यांदा मानमहाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु झाल्यापासून १९७० साली प्रथम स्पर्धा संयोजन करण्याचा मान मिळाला. त्यानंतर १९८३, १९९३, १९९७-९८, इंदापूर (२००४-०५), बारामती (२००४-०५), भोसरी (२०१३), वारजे (२०१६), म्हाळुंगे-बालेवाडी(२०१९) आणि यंदा २०२२ करीता पुन्हा पुण्याला मान मिळत आहे. गेल्या ४५ वर्षांच्या संयोजनात हा दहाव्यांदा मान मिळत आहे.