पुणे : समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि ६१ वी वरिष्ठ गट राज्य कुस्ती स्पर्धा मुळशी तालुक्यातील भूगाव येथे कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत रंगणार आहे. येत्या २० ते २४ तारखेदरम्यान ही स्पर्धा होईल.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी याबाबत शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, राहुल शेडगे, किसन बुचडे हे उपस्थित होते.मंगळवारी (दि. १९ डिसेंबर) खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. स्पर्धेचे उद््घाटन गुरुवारी (दि. २१) क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होईल. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते उपस्थित राहणार आहेत. समारोपाला दि. २४ रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.दिनेश गुंड म्हणाले, ‘‘स्पर्धा माती व गादी विभागांत प्रत्येकी १० गटांत होणार आहे. यात अ गटात ५७, ७४, ७९ किलो, ब गटात ६१, ७०, ८६ किलो, क गटात ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरीसाठी ८६ ते १२५ किलो वजनी गटांचा समावेश आहे. ड विभागात ६५ आणि ९२ किलो वजनी गटांचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघांतील तब्बल ९०० मल्ल सहभागी होणार आहेत.अभिजित, चंद्रहार, रानवडे यांच्याकडे लक्षबाळासाहेब लांडगे म्हणाले, ‘‘स्पर्धेत यंदा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटके, शिवराज राक्षे, तानाजी झुंजुरके, साईनाथ रानवडे (सर्व पुणे), सागर बिराजदार (लातूर), किरण भगत (सातारा), महेश वरुटे, कौतुक डाफळे (कोल्हापूर), माऊली जमदाडे, महादेव सरगर (सोलापूर) हे अव्वल खेळाडू आपले कसब पणाला लावतील.’’इतर वजनी गटात सूरज कोकाटे, गणेश जगताप, अभिषेक तुरकेवाडकर, तानाजी वीरकर, ज्योतिबा अटकळ असे अनेक अव्वल मल्ल झुंजताना दिसतील.मागील वर्षी पुण्यातील वारजे येथे तर २००९ मध्ये सांगवी आणि २०१४ मध्ये भोसरी येथे ही स्पर्धा झाली होती.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा बुधवारपासून, भूगाव येथे आयोजन, अव्वल मल्लांमध्ये गदेसाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:35 AM