Maharashtra Kesari : नुकत्याच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख याच्यावर सेमीफायनल स्पर्धेत अन्याय झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरुन सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक पैलवानांवर अन्याय होत असल्याचा आरोप अनेक पैलवानांनी केला आहे. यावर आता डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत वादविवादाशिवाय भरवण्याची तयारी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दाखवली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पै.चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची तयारी दाखवली आहे. पुढची होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत भरवण्याची परवानगी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने देण्याची मागणी चंद्रहार पाटील यांनी केली आहे, तसेच विजेत्या मल्लास १ कोटींचे बक्षीस देणार असल्याचेही पै. पाटील यांनी म्हटले आहे.
'महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होत आला आहे. पैलवानांवर असा अन्याय झाल्यास ते आत्महत्यापर्यंतही पोहोचतात. माझ्यावरही या स्पर्धेत अन्याय झाला होता, तेव्हा मीही आत्महत्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो, मात्र यातून मी सावरलो आहे. कुस्ती क्षेत्रातील चार व्यक्तींनी माझ्यावर अन्याय केला. त्यांना माझ सांगण आहे की, कोणत्याही पैलवानावर अन्याय करु नका, असंही डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील म्हणाले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होतो, प्रत्येक वर्षीची स्पर्धा वादात असते. यावेळी सांगलीत या स्पर्धा घेण्यासाठी परवानगी द्या, सांगलीत या स्पर्धा विना वादाच्या होतील. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानास १ कोटींचे बक्षीस देणार असल्याचेही पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले.