जालना : येथील आझाद मैदानावर १९ ते २३ डिसेंबर दरम्यान ६२ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगेल. या स्पर्धेत जवळपास ९०० पहेलवान आणि अन्य तांत्रिक अधिकारी, कर्मचारी आणि पदाकारी मिळून एक हजार २०० जणांची उपस्थिती राहणार आहे. गादी आणि माती गटात ही स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि जालना जिल्हा कुस्तीगिर परिषदेचे जिल्हाध्यक्ष पहेलवान दयानंद भक्त यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ संघ सहभागी होतील. महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यास दोन लाख रूपये आणि चांदीची गदा प्रदान करण्यात येईल. ‘यंदा बक्षिस रकमेतही वाढ करण्याचा विचार आहे,’ अशी माहितीदेखील अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिली.>स्पर्धेच्या सांगतेसाठी महाराष्ट्र कुस्तीगिर स्पर्धेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळाली. या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे दोन मैदानांची उभारणी करण्यात आली असून ५० हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.
जालन्यात १९ डिसेंबरपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:11 AM